मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली तिरडी मोर्चा, संतप्त नागरिकांनी कार्यालयाच्या दारात फोडली मडकी,अन्यथा, बुधवारी ठामपावर धडक देणार
ठाणे – विविध कारणे पुढे करून सातत्याने मुंब्रा- कौसावासियांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. या सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात मुंब्रावासिय रस्त्यावर उतरले. दारूल फलाह मस्जिदपासून फायर ब्रिगेड येथील पाणीपुरवठा कार्यालयावर तिरडी मोर्चा नेऊन नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली. तसेच, कार्यालयाचे दार उघडत नसल्याने प्रवेशद्वारासमोर मडकी फोडत ठिय्या धरला. यावेळी मा. विरोधीपक्ष नेते अश्रफ (शानू) पठाण हे देखील उपस्थित होते. दरम्यान, येत्या मंगळवार पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास बुधवारी ठामपावर धडक मोर्चा नेण्याचा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला.
धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने दहा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, मुंब्रा , कौसा परिसरात गेले चार दिवस पाणीपुरवठाच करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलवावे लागत आहेत. याविरोधात शानू पठाण यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर पाणी पुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पाण्याचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यानिषेधार्थ हा तिरडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी खांद्यावर तिरडी घेऊन प्रशासनाचा निषेध केला. या मोर्चात महिला, मुले , पुरूष असे सुमारे दोन हजार नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी पाणीपुरवठा कार्यालयावर धडक दिल्यानंतर कार्यालयाला बंद असल्याचे दिसल्याने संतप्त झालेल्या मोर्चेकऱ्यांनी कार्यालयाच्या दारात मडकी फोडली. तसेच, गेटवर चढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडविले.
या प्रसंगी मर्जिया पठाण म्हणाल्या की, ठाणे शहरात 10 टक्के पाणी कपात करण्यात आली असली तर 90% पाणीपुरवठा केला जात नाही. गेल्या 15 दिवसांपासून पाणीच सोडण्यात येणार नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मुंब्रा – कौसा भागातील नागरिकांना गेल्या काही दिवसात टँकरवर लाखो रूपये खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. पालिका अधिकारी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी पाण्याचा पुरवठा अनियमित करीत आहेत. त्यामुळे येत्या मंगळवार पर्यंत पाण्याचा पुरवठा सुरळीत न केल्यास बुधवारी ठामपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.