कर्जत – पाणीटंचाईवर उपाय म्हणून कर्जत तालुक्यात गाव, वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, चांगला पाऊस झाल्याने टँकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्याचवेळी टँकरचालकांचा कर्जत पंचायत समितीकडून सन्मान करत त्यांना निरोप देण्यात आला आहे. कर्जत तालुक्यात डोंगर दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे. या भागात राहणाऱ्यांवर उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ येते. तेव्हा प्रशासनाकडून दिलासा देण्यासाठी पाणीटंचाई कृती आराखड्यातून पाण्याचे टँकर सुरू करण्यात येतात. मात्र आता जूनच्या उत्तरार्धात पावसाने दमदार आगमन केल्याने पाण्याचे टँकर बंद करण्यात आले आहेत.
कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. भौगोलिक दृष्ट्या दूरवर पसरलेल्या या तालुक्यामध्ये उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. उन्हाच्या झळांसोबत पाणीटंचाईच्या झळादेखील तीव्र होतात. त्यामुळे प्रशासनाकडून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. त्यानुसार यंदा एप्रिलमध्ये एका टँकरने सुरुवात झाली. जलजीवन मिशन योजना राबवलेल्या गावातही पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे जूनपर्यंत 16 गावे आणि 27 वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.
यंदा तब्बल 5 टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. ही बाब चिंताजनक असली तरी प्रशासनाने टँकरच्या माध्यमातून मोठा दिलासा दिला. यावर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गोवर्धन नखाते यांनी उत्तम देखरेख ठेवली होती. तर ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत होते. दरम्यान जूनच्या उत्तरार्धात पाऊसाने दमदार हजेरी लावल्याने नदी-ओढे वाहायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.