अलिबाग – निसर्गरम्य सुंदर आणि स्वच्छ अलिबागला आता अस्वच्छतेचा मोठा डाग लागला आहे. अनेक दिवसांपासून शहरातील कचरा नियमित न उचलला गेल्याने अलिबागमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. याविरोधात लोकांमध्ये संतापाची लाट उसळलेली असतानाच माजी नगरसेवक अमर वार्डे यांनी शहरातील समस्यांना वाचा फोडून अलिबागकरांच्या संतापाला वाट करून दिली आहे.
स्वच्छ अलिबागला काही दिवसांपासून अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. शहरात कुठेही नजर टाकली तरी कचऱ्याचे ढीग दिसतात. आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे कचरा कुजून विविध आजारांना आयते आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. शिवाय हाच कचरा नाल्यात जाऊन नाले तुंबण्याची भीती आहे. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अमर वार्डे यांनी अलिबागमधील समस्यांना वाचा फोडणारे पत्र नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लिहिले. यात कचरा, पाणी, अतिक्रमण, बकालीकरण याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.