ठाणे – ठाणे शहरात शुक्रवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तर गावंड बाग भागात फुटबॉल टर्फवर वाऱ्यासोबत उडून आलेला लोखंडी पत्र्याने 8 मुले जखमी झाली आहेत. एकूण 17 मुलं याठिकाणी खेळत होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
ठाणे शहरात सोसाट्याचा विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने ठिकठिकाणी वृक्ष पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. गावंड बाग परिसरातील फुटबॉल टर्फवर मुलं फुटबॉल खेळत होते. यावेळी त्यांच्यावर इमारतीचा पत्रा पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमी विद्यार्थ्यांना ठाण्यातील बेथनी रुग्णालयामध्ये प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, फुटबॉल टर्फवर सर्व मुलं खेळत होती. लहान-मोठी सर्व मुलं खेळत होती. लहान मुलांना घरी पाठवण्यात आलं, त्यानंतर मोठी मुलं फुटबॉल खेळत होती. जोरदार पाऊस सुरू झाला, त्यासोबत सोसाट्याचा वारा सुरू झाला. जोरदार वाऱ्यामुळे बिल्डिंगवरचा पत्रा खाली कोसळला. पत्रा टर्फवर कोसळल्यामुळे आठ जणांना दुखापत झाली, त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही समोर आली आहे.