दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा भाग ढासळला

0

डोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि ऐतिहासिक कल्याणचे सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा भाग गुरुवारी रात्रीच्या सुमारास ढासळला. गुरूवारी रात्री झालेल्या पावसामुळे हा भाग कोसळल्याचे सांगितले जात आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीलाच ही घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे. नव्याने बांधलेल्या बुरुजाला मोठमोठ्या भेगाही पडल्या असून तो भागही कधीही कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूचा हा बुरूज आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काही वर्षांपूर्वीच इतर बुरुजांसह या जुन्या बुरुजावर नव्याने बांधकाम केले आहे. या नव्या बुरुजाचा खालील भाग ढासळला असल्याचे काल रात्री काही नागरिकांच्या लक्षात आले. दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिराचा बाहेरील चौथराही एका बाजूने खचू लागला असून त्याची आणि या बुरुजाची तातडीने डागडुजी करणे आवश्यक बनले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी शहरप्रमुख रवी पाटील यांच्याकडून करण्यात आली. त्यापैकी सुरुवातीला अडीच कोटी आणि नंतर पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कल्याणच्या या दुर्गाडी किल्ल्याला ऐतिहासिक महत्व असून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊनच कल्याणच्या खाडी किनारी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची उभारणी केल्याचे सांगितले जाते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech