(टीम ठाणेकर)
ठाणे – ठाणे जिल्हा परिषद मधील गुणवंत कर्मचारी म्हणून प्रेरित होऊन अधिकारी व कर्मचारी यांनी काम करावे. आजचा कार्यक्रम महत्त्वाचा होता यांचा मला मनस्वी आनंद होत आहे. कारण डोंगराळ भागात, गाव खेड्यात तुम्ही ग्रामस्थांपर्यंत पोहोचून त्यांना शासकीय योजनांची माहिती देत आहात. शासकीय काम करताना पूर्णवेळ तन्मयतेने, मनोभावाने काम करणे महत्त्वाचे आहे. आज या कर्मचाऱ्यांना गुणगौरव पुरस्काराने सन्मानित केले असेच पुढे देखील उत्तमरित्या कामकाज करण्याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शुभेच्छा दिल्या.
महिला बाल विकास विभाग अंतर्गत आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका व सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत कार्यरत वर्ग-3 व वर्ग-4 या संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला ही आनंदाची बाब आहे. ठाणे जिल्हा परिषद मिनी मंत्रालय म्हणून ग्रामीण भागाच्या विकासासाठी कामकाज करते या कामाला उंचावर घेऊन जाण्यासाठी तुम्ही सर्वांनी मोलाचे योगदान दिले आहे. शासकीय सेवेत रुजू झाल्यापासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत सूपूर्त केलेल्या कार्यालयीन कामकाजाचा वेळीच निपटारा करण्यासाठी, प्रशासकीय व वैयक्तिक कौश्यल्य पणाला लावुन शासकीय कामात दाखविलेल्या नैपुण्याबद्दल तसेच ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाच्या केंद्र व राज्यशासनाच्या योजना राबविण्यासाठी, त्याची वेळेत अंमलबजावणी करून ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी कार्यालयीन वेळेत/ वेळेनंतर तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशीदेखील काम तुम्ही कामकाज करत आहात ही महत्त्वाची बाब आहे असे मार्गदशन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी केले.
महिला बाल विकास विभाग अंतर्गत आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका व सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत कार्यरत वर्ग-3 व वर्ग-4 या संवर्गातील अधिकारी,कर्मचारी यांचा आदर्श गुणगौरव पुरस्कार सोहळा जिल्हाधिकारी
कार्यालयातील नियोजन भवन येथे आज पार पडला. अधिकारी व कर्मचारी यांना एकूण ४२ विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. उत्तम कामकाज केल्याबद्दल पंचायत समिती शहापूर येथील गट विकास आधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान देखील करण्यात आला.
या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. गंगाधर परगे, महिला व बाल विकास विभाग प्रमुख संजय बागुल, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग कुंदा पंडित, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग प्रमुख प्रदिप कुलकर्णी, लघु पाटबंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे तसेच सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अविनाश फडतरे यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविका करताना सांगितले की सेस फंडातून विविध योजना राबविल्या जातात पण वर्ग-3 व वर्ग-4 या संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी कोणतेच पुरस्कार दिले जात नव्हते. ही बाब लक्षात घेऊन माजी. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाने ही योजना राबविण्यात येत आहे. आदर्श कर्मचारी गुणगौरव पुरस्कार योजना पुढील काम जोमाने करण्यासाठी मोलाची ठरणार आहे.
थेटर ऑफ रिलेवन्स यांच्या माध्यमातून ‘ती प्रकृती आणि संस्कृती’ या नाटकाचे सादरीकरण करून आजच्या कार्यक्रमाची उंची वाढवली. डॉ. विद्या शिर्के व पर्यवेक्षिका श्रीम. रतन कुराडे यांनी उत्तमरित्या सुत्रसंचलनाची भुमिका पार पाडली. कार्यक्रमाचे आभार उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. प्रमोद काळे यांनी व्यक्त केले.