विरोधकांनी साथ दिल्यास शहराचा झपाट्याने विकास – खा. श्रीकांत शिंदे

0

अंबरनाथ – ज्या शहरात सत्ताधाऱ्यांना विरोधकांची साथ मिळते, त्या शहरात विकासप्रकल्प वेगाने मार्गी लागतात. परिणामी नागरिकांना अनेक सोयी सुविधा अल्पावधीतच उपलब्ध होतात.याचे जिवंत उदाहरण अंबरनाथ शहर आहे, अशा शब्दांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथकरांबद्दल गौरवोद्गार काढले. अंबरनाथमध्ये काही वर्षांत अनेक विकासकामे झाल्यायामुळे आधीच्या आणि आताच्या अंबरनाथमध्ये खूप फरक दिसतो आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

अंबर भरारी संस्था आयोजित “टॉक ऑन डेव्हलपमेंट विथ डॉक्टर” या संवाद कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथमध्ये रविवारी करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. या वेळी डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून नव्याने विकसित करण्यात आलेल्या अंबरनाथ येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाचे लोकार्पणही करण्यात आले.

कार्यक्रमात सुप्रसिद्ध निवेदिका पूर्वी भावे यांनी खासदार डॉ. शिंदे यांच्याशी संवाद साधला. विविध विषयांवर खासदार डॉ. शिंदे यांनी आपली मते व्यक्त केली. अंबरनाथ शहराच्या विकासाचा एक वेगळाच पॅटर्न ठरला का, या प्रश्नावर डॉ. शिंदे यांना त्याचे श्रेय सर्वांना दिले. शहरात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी साथ दिल्यास आणि त्यात माध्यमे आणि समाजही सहभागी झाल्यास काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंबरनाथ, असे डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. प्राचीन शिव मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प, शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, उभे राहणारे वैद्यकीय महाविद्यालय तसेच प्रशस्त रुग्णालय आणि कल्याण, डोंबिवलीसह विविध ठिकाणी पूर्णत्वास जात असलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प याबाबतही त्यांनी आवर्जून संवाद साधला. येणाऱ्या काळात कल्याण मतदारसंघातील नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लागावी यासाठी लवकरच नवीन जलस्रोत उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः काळू धरण उभारणीसाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

या पुढेही याच पद्धतीने सर्वांचे सहकार्य लाभावे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच सर्वांच्या साथीने विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही डॉ. शिंदे यांनी सांगितले. उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांचे विविध प्रश्न समजून घेत प्रश्न लवकरच मार्गी लावण्याबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

नेहरू उद्यानाचा कायापालट….खासदारांची वचनपूर्ती..

कानसई येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाची काही वर्षांत मोठी दूरवस्था झाली होती. ही बाब तीन वर्षांपूर्वी अंबरनाथमधील एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पत्रकारांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर आणली. त्याच कार्यक्रमात खासदार शिंदे यांनी या उद्यानाचा कायापालट करण्याचा शब्द अंबरनाथकरांना दिला होता. त्यानुसार आराखडा तयार करणे, शासकीय मंजुरी मिळवणे, निधीची तरतूद करणे, निविदा प्रक्रिया असे सोपस्कार पूर्ण करून या उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कामाला अंबरनाथ पालिकेकडून सुरुवात करण्यात आली. या उद्यानाचा आता खरोखर कायापालट करण्यात आला असून त्यामुळे अंबरनाथकरांना एक चांगले उद्यान मिळाले आहे.

कायापालट झालेल्या उद्यानात सुंदर असा बगीचा, मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी, नागरिकांसाठी व्यायामाचे साहित्य, जॉगिंग ट्रॅक, सिंथेटिक ट्रॅक, मुलांना खेळण्यासाठी स्केटिंग ट्रॅक यांसारख्या अनेक सुविधा आहेत. उद्यानाची खासियत म्हणजे येथे झालेला कॅफेटेरिया. या ठिकाणी उभारण्यात आलेला कॅफे उद्यानास भेट देणारी कुटुंबं आणि इतरांसाठीही क्वालिटी टाइम घालविण्यासाठी एक हक्काचे ठिकाण ठरणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech