84 टेबल आणि 29 फेऱ्या ठरवणार खासदार, मतमोजणीसाठी 600 अधिकारी आणि कर्मचारी
कल्याण – लोकसभेच्या कल्याण मतदारसंघात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असून 84 टेबल्सवर मतमोजणीच्या 29 फेऱ्या होतील. या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी ही माहिती दिली. मतमोजणीसाठी नुकतेच कर्मचारी प्रशिक्षणही झाले.
लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी झाले. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तीन मतदारसंघांमध्ये मतदान झाले होते. त्यापैकी कल्याण मतदारसंघाची मतमोजणी डोंबिवली पूर्वेतील वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात होईल. मंगळवार, 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.
या मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे पहिले प्रशिक्षण शिबीर 28 मे 2024 रोजी डोंबिवली (पूर्व) येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरात झाले. तर दुसरे शिबीर वा रंगीत तालीम सोमवार, 3 जून 2024 रोजी सकाळी 6.00 वाजता सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहातच होणार आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १४ प्रमाणे एकूण ८४ टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार असून, मतदानाच्या एकूण २९ फे-या होतील. मतमोजणी प्रक्रियेत ६०० अधिकारी, कर्मचारी (पोलिस वगळून) सहभागी होतील, असेही सुषमा सातपुते यांनी स्पष्ट केले आहे.