मुंबई – राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. कारण कांद्यावरील निर्यातबंदी हटवून देखील कांद्याचे दर वाढत नाहीत. याचा फटका कांदा उत्पादक शेतक-यांना बसत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीचा मोठा फटका बसला असून परकीय चलनात ६४९ कोटी रुपयांची तूट आली आहे तर ८ लाख १७ हजार ५३० मेट्रिक टन कांद्याची निर्यात कमी झाली आहे.
कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारने नेहमीच धरसोडीचे धोरण अवलंबले आहे. या धोरणाचा कांदा उत्पादक शेतक-यांना मोठा फटका बसला. सरकारने ८ डिसेंबर २०२३ रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी घालताना सरकारने ३१ मार्चपर्यंत बंदी उठविणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ३१ मार्चला बंदी उठविली गेली नाही. जोपर्यंत पुढील आदेश येत नाही, तोपर्यंत कांद्याची निर्यात बंदच राहणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.
विशेष म्हणजे याचा परिणाम देशाच्या परकीय चलनावरही होत आहे. गेल्या आर्थिक वर्षात परकीय चलनात ६४९ कोटी रुपयांची तूट तर ८ लाख १७ हजार ५३० मेट्रिक टन कांद्याची निर्यात कमी झाल्याची बाब अपेडाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. सन २०२३ ते २४ या आर्थिक वर्षात १७ लाख ७ हजार ९९८ मेट्रिक टन कांदा निर्यात झाला आहे. यातून ३ हजार ८७४ कोटी रुपयांचे चलन मिळाले आहे तर सन २०२२ ते २३ या आर्थिक वर्षात २५ लाख २५ हजार २५८ मेट्रिक टन कांदा निर्यात झाला आहे. यातून ४ हजार ५२२ कोटी रुपयांचे चलन मिळाले आहे.