ठाणे, रत्नागिरी – सिंधुदुर्ग साठी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला..

0

(टीम ठाणेकर)

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता कधीही जाहीर होण्याची शक्यता असतानाच महायुती आणि महाआघाडी यांच्यातील जागा वाटपांमधून सर्वच पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातही सर्वात जास्त कसरत आणि मेहनत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेकडील जागा शिवसेनेकडे राखण्यासाठी करावी लागत आहे. भाजपचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी हे इलेक्टिव्ह मेरिट अर्थात जिंकून येण्याची क्षमता या एकाच निकषावर जागावाटप आणि उमेदवार निश्चित करण्याचे काम अत्यंत नियोजनबद्ध वृत्तीने करत आहेत. आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या तसेच मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यातील लोकसभेचा ठाणे मतदारसंघ भाजपाकडे घेण्याच्या जोरदार हालचाली दिल्ली दरबारी सुरू आहेत. विशेष म्हणजे बेलापूरचे भाजपाचे आमदार आणि ठाणे जिल्ह्याचे तब्बल पंधरा वर्षाहून अधिक काळ पालकमंत्रीपद भूषवलेले गणेश नाईक ठाणे मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.

ठाणे, कल्याणसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात त्या जिल्ह्यात लोकसभेच्या ठाणे कल्याण आणि भिवंडी अशा तीन जागा आहेत या तीन मतदारसंघांपैकी ठाणे आणि कल्याण हे शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ आहेत, तर भिवंडी हा भारतीय जनता पार्टीकडे असलेला मतदारसंघ आहे. लोकसभा कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे हे याआधी 2014 आणि 2019 अशा दोन्ही लोकसभा निवडणुका प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत. तर ठाणे मतदारसंघाचे खासदार राजन विचारे जरी शिवसेनेचे असले तरी ते मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेचे नसून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. आणि खरे तर यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे मतदारसंघ शिवसेनेकडे राखण्यासाठी मोठी कसरत होत आहे.

कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांची सुपुत्र श्रीकांत शिंदे जरी यापूर्वी दोन वेळा लोकसभेवर मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आले असले तरी देखील सध्याची कल्याण मतदारसंघातील राजकीय स्थिती ही शिवसेनेपेक्षा आम्हाला अधिक अनुकूल आहे असं भाजपा नेत्यांचं स्पष्ट म्हणणं आहे.

याबाबत मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधीलच भाजपाचे डोंबिवलीकर मंत्री रवींद्र चव्हाण तसेच या मतदारसंघासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून पाठवण्यात आलेले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण मतदारसंघाबाबत वेगवेगळी विधाने केली होती. राजकीयदृष्ट्या विचार करायचा झाल्यास कल्याण मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील पहिला मुंब्रा कळवा हा राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे. डोंबिवली भाजपाचे याच सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे कल्याण ग्रामीण मतदारसंघ मनसेचे एकमेव आमदार व विधानसभेतील गटनेते राजू पाटील यांच्याकडे आहे कल्याण पूर्व हा भाजपला समर्थन दिलेले अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे आहे. उल्हासनगर मतदारसंघातून भाजपचे कुमार अहिराणी आमदार आहेत तर केवळ अंबरनाथ या एकमेव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे डॉक्टर बालाजी किणीकर आमदार आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघांमध्ये डोंबिवली, कल्याण पूर्व आणि उल्हासनगर असे तीन विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे आहेत तर केवळ अंबरनाथ हा एकमेव मतदारसंघ मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडे आहे तर उर्वरित दोन्हीही मतदारसंघ विरोधी पक्षांकडे आहेत.

काही दिवसांपूर्वीच कल्याण पूर्वचे भाजपा समर्थक अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्याण शहरप्रमुखावर गोळीबार केला होता आणि मुख्यमंत्र्यांवर काही गंभीर आरोपही केले होते. या पार्श्वभूमीवर कल्याणची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्यासाठी जेवढी वाटते तेवढी सोपी राहिलेली नाही. मात्र एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या सुपुत्राकडे असलेला मतदारसंघ भाजपकडे गेल्यास राज्यातील जनतेपुढे वेगळाच संदेश जाईल, हे लक्षात घेऊन कल्याणचा हट्ट भाजपा पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सोडला आहे असे बोलले जात आहे.

मात्र एकीकडे कल्याण मतदारसंघ मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांसाठी देखील अडचणीचा असताना दुसरीकडे लोकसभेचा ठाणे मतदारसंघ तरी मिळावा, अशी भाजपा पक्षश्रेष्ठींची तसेच राज्यातल्या भाजपा नेत्यांची आग्रहाची आणि हट्टाची मागणी आहे.

लोकसभेच्या ठाणे मतदारसंघात जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात, त्यामध्ये ठाणे शहर, ऐरोली आणि बेलापूर या तीनही विधानसभा मतदारसंघातून संजय केळकर. मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक असे भाजपाचे तीन आमदार निवडून आलेले आहेत. मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन अपक्ष असल्या तरी त्या मूळच्या भारतीय जनता पार्टीच्याच आहेत. त्यामुळे त्यांचेही समर्थन भाजपाच्या पारड्यात जाईल. त्यामुळे ठाणे मतदारसंघात भाजपला पाठबळासाठी सहापैकी चार आमदार आहेत तर शिवसेनेकडे केवळ स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिनिधित्व करत असलेला कोपरी पाच पाकळी मतदारसंघ आणि प्रताप सरनाईक प्रतिनिधित्व करत असलेला ओवळा माजिवडा असे दोनच मतदारसंघ आहेत. तसेच जैन उत्तर भारतीय गुजराती मारवाडी अशा मतदारांची लक्षणीय संख्या ठाणे मतदारसंघात आहे आणि हा भाजपाचा परंपरागत मतदार असल्याने ही जागा शिवसेनाऐवजी भाजपाला मिळावी असा राज्यातील आणि केंद्रातील भाजपा नेत्यांचा हट्ट आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर गेल्यानंतर जे खासदार मुख्यमंत्र्यांबरोबर गेले, त्या खासदारांमध्ये स्वतः मुख्यमंत्री ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात, ज्या शहरातून निवडून येतात त्या मतदारसंघातील खासदार मात्र उद्धव ठाकरे यांच्याच सोबत राहिल्याकडे भाजपा नेते अंगुलीनिर्देश करत आहेत.

मात्र असे असले तरी देखील ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण हे दोन मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेकडे राहिले पाहिजेत अशी येथील शिवसैनिकांची ठाम धारणा आहे. यातील एक जरी मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे गेला तर ते मुख्यमंत्र्यांसाठी अडचणीचे ठरू शकते, अशी शिवसैनिकांची भावना आहे. ठाणेकर शिवसैनिकांची ही भावना लक्षात घेऊनच कल्याणसह ठाणे मतदारसंघही शिवसेनेकडेच राहिला पाहिजे अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी भाजपासमोर मांडल्याचे समजते. मुंबई ठाणे आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्ये शिवसेनेला मानणारा मतदार प्रचंड प्रमाणावर आहे त्यामुळे हे तीनही मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःकडे हवे आहेत.

ठाणे जिल्ह्यातही कोकणातील मतदार प्रचंड प्रमाणावर आहेत. तसेच शिवसेनेचा मूळ बेस कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधून येतो हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा कोकणातील मतदारसंघ देखील शिवसेनेकडेच हवास अशी परखड भूमिका घेतली आहे. यामुळेच दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांनी केसाने गळा कापू नका अशा शब्दांत भाजपा नेत्यांची कानउघडणी केली होती.

मात्र ठाणे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन मतदारसंघांसाठी शिवसेना आणि भाजपाही कमालीचे आग्रही असताना आणि महायुतीच्या जागावाटपात या दोन मतदारसंघाचा प्रमुख अडसर असताना भाजपाने या दोन्ही मतदारसंघाबाबत कठोर भूमिका घेतल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता अंतिमतः कोणता निर्णय घेतात, याबाबतही ठाणेकर शिवसैनिकांमध्ये उत्सुकता आहे.

दुसरीकडे भाजपाला महाराष्ट्रातील स्वतःच्या खासदारांची संख्या 24 वरून 32 ते 35 च्या दरम्यान न्यायची असल्याने मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडील काही मतदारसंघ भाजपकडे आल्याखेरीज महाराष्ट्रातून संसदेतील स्वबळ वाढणार नाही, याची जाणीव भाजपाला आहे. त्यामुळेच दिल्लीतील भाजपा पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रातून किमान 32 ते 35 जागांसाठी कमालीचे आग्रही आहेत. परिणामी येत्या दोन-तीन दिवसांतच याबाबत पक्षश्रेष्ठींच्या स्तरावरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे भाजपा नेत्यांकडून सांगण्यात येते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech