नवी दिल्ली : येत्या १ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशी वाराणसीला न जाता पंतप्रधान मोदी थेट कन्याकुमारी गाठणार आहेत. तिथे ते स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानाला बसणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधानांच्या या दौ-यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी खोचक टीका केली आहे. जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर लिहिले की, मी असे ऐकले आहे की, निवर्तमान पंतप्रधान ३० मे ते १ जूनदरम्यान कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकात ध्यानासाठी जाणार आहेत. ७ सप्टेंबर २०२२ रोजी राहुल गांधींनी तिथूनच भारत जोडो यात्रा सुरू केली होती. आता पंतप्रधान त्याच ठिकाणाहून आपल्या निवृत्त जीवनाचा प्रवास सुरू करणार आहेत असा त्यांनी लगावला.
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदींनी केदारनाथला भेट दिली होती. तिथे रुद्र गुहेत त्यांनी बराचवेळ ध्यान केले. त्यावेळी त्यांच्या त्या दौ-याची खूप चर्चा झाली होती. आता पीएम मोदी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद मेमोरियल येथे ध्यान करणार आहेत. पीएम मोदींच्या कन्याकुमारी दौ-यावर भाजपची प्रतिक्रिया आली आहे. भाजपच्या पदाधिका-यांनी सांगितले की, ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीची निवड करण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय विवेकानंदांची देशासाठीची दृष्टी साकार करण्याची त्यांची वचनबद्धता दर्शवते. पंतप्रधान मोदी ज्या खडकावर ध्यान करणार आहेत, त्याचा विवेकानंदांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला आहे. देशभर प्रवास करून विवेकानंद इथे पोहोचले आणि तीन दिवस ध्यान करुन विकसित भारताचे स्वप्न पाहिले.