मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी उमेदवार आणि राजकीय पक्षांची धडधड वाढू लागली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून, महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीतील दोन पक्षांना किती जागा मिळणार, याची उत्सुकता असून, सट्टा बाजाराने नाशिकची जागा शिंदेंची शिवसेना जिंकेल, असा अंदाज मांडला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना अशी थेट लढत आहे. या मतदारसंघातून छगन भुजबळांना उमेदवारी देण्याची सूचना भाजपने केली होती, पण शिंदेंनी ही जागा राखत पुन्हा एकदा हेमंत गोंडसेंना उमेदवारी दिली.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी राजाभाऊ वाझे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे-शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. गेल्या दोन वेळा शिवसेनेकडे राहिलेल्या या मतदारसंघात यावेळी कोणत्या शिवसेनेचा विजय होईल, यांची चर्चा असताना सट्टा बाजाराने शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने अंदाज व्यक्त केला आहे.