पोलिसांना गुंगारा देणाऱ्या विशाल अग्रवालला ‘जीपीएस’ने पकडले!

0

पुणे : पुण्यातील कल्याणीनगरात भरधाव वेगातील पोर्शे कारने धडक दिल्याने बाईकवरील दोन इंजिनिअर तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता अनेक नवे खुलासे होत आहेत. आपल्या अल्पवयीन मुलाच्या या कृत्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी बिल्डर विशाल अग्रवाल गुंगारा देत राहिला. त्यासाठी त्याने अनेक क्लृप्ता केल्या वारंवार आपले लोकेशन बदलले पण अखेर ‘जीपीएस’ने संभाजीनगरात त्याला जेरबंद केले.

पोर्शे कार अपघातानंतर विशाल अग्रवालला जाणीव झाली की, आता आपल्याला अटक होणार आहे. त्यानंतर तो पहिल्यांदा पुण्यातील आपल्या फार्म हाऊसवर गेला. तिथून कोल्हापूरला गेला, तेथे तो आपल्या एका मित्राला भेटला त्यानंतर विशालने आपल्या एका ड्रायव्हरला मुंबईला पाठवले. कारण पोलिसांना असे वाटायला हवे की तो कोल्हापूरला गेला त्यानंतर तिथून मुंबईला गेला.

पण प्रत्यक्षात विशाल अग्रवाल कोल्हापुरातून आपल्या मित्राच्या कारने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) इथे गेला. आपला ठावठिकाणा कोणालाही लागू नये, यासाठी त्याने आपल्या कुटुंबियांना देखील चुकीची माहिती दिली. त्याने आपण मुंबईला चाललो असल्याचे आपल्या कुटुंबियांना सांगितले होते. यानंतर त्याने आपला मोबाईल स्वीचऑफ केला. त्याने संपर्कासाठी नवे सीमकार्डही विकत घेतले.

पोलिसांना विशालच्या मित्राच्या कारमधील ‘जीपीएस’मुळे त्याच्या हालचालीचा पत्ता लागला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्र हालवत सीसीटीव्ही वरील फुटेज तपासले. तसेच विशालने आपल्या कुटुंबियांना मेसेज केला होता त्या मोबाईलचे लोकेशन तपासले असताना तो संभाजीनगरच्या एका छोट्या लॉजमध्ये लपल्याचे पोलिसांना कळाले. इथून पोलिसांनी त्याला अटक केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech