घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास आता एसआयटीकडे

0

मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आता विशेष चौकशी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू राहणार आहे. दरम्यान, या प्रकरणी बुधवारी आणखी एका जखमीचा मृत्यू झाला आहे.

सोमवार, १३ मे रोजी जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे घाटकोपर येथे उभारण्यात आलेले इगो कंपनीचे एक होर्डिंग जवळच असलेल्या एका पेट्रोलपंपावर कोसळले. त्यात सात जणांचा मृत्यू झाला तर ऐंशीहून अधिक लोक जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर पंतनगर पोलिसांनी इगो कंपनीच्या भावेश भिंडेसह इतर आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधासह भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच भावेश पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी विविध पथकांकरवी शोध सुरू होता. या दरम्यानच त्याला राजस्थानच्या उदयपूरमधील एका हॉटेलमधून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास नंतर पंतनगर पोलिसांकडून गुन्हे शाखेच्या युनिट सातकडे वर्ग करण्यात आला. गुन्ह्याचे सर्व कागदपत्र हाती येताच गुन्हे शाखेने भावेशला अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या २६ मेपर्यंत पोलीस कोठडीत आहे.

होर्डिंग दुर्घटनेच्या तपासासाठी आता विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली असून पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. या पथकाने मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या कार्यालयातून काही कागदपत्रे हस्तगत केली असून त्याचा तपास सुरू आहे. दुर्घटनाग्रस्त होर्डिंगचा एक नमुना माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलाजिकल इन्स्टिट्युटला पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल लवकरच मिळणार असून त्यानंतर काही गोष्टींचा उलगडा होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. याच प्रकरणात आतापर्यंत काहीजणांची जबानी नोंदविण्यात आली आहे. त्यात भिडेच्या मुलुंड येथील कार्यालयातील तीन कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या जबानीतून भिडेने होर्डिंगचे आऊट सोर्सिंग केल्याचे सांगितले जाते. त्यातून त्याला काही उत्पन्न मिळत होते. त्याची व्यावसायिक बाजू तपासण्याचेही काम सुरू आहे. पोलिसांचे एक विशेष पथक होर्डिंग बांधकामाचे काही नमुने घेऊन माटुंगा येथील व्हीजेटीआय येथे घेऊन गेले होते. त्याच्या अहवालानंतर पोलिसांच्या पुढील तपासाची दिशा ठरणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech