धो डाला…

0

भारताच्या युवा संघाने कसोटी मालिका 4-1 ने जिंकली!
धरमशाला

भारतीय क्रिकेट संघाने पाहुण्या इंग्लंडच्या संघाला 4-1 अशी एकतर्फी धूळ चारली. विराट कोहलीने घेतलेली रजा, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराशिवाय कमकुवत भासणारी मधली फळी, श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे संघाबाहेर होणं या सगळ्या अडचणींनंतरही टीम इंडियाने केलेली कामगिरी जबरदस्त आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर संघातील खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी निर्णायक कामगिरी केल्यानेच भारलाला मालिकेत एकतर्फी विजय मिळवता आला.

या विजयामुळे टेस्ट चॅपियनशिपमध्येही भारताला नक्कीच मोठा फायदा झालाय. तर इंग्लंडचा संंघ या स्पर्धेत जवळपास रसातळाला गेलाय.

फलंदाजीत यशस्वी जायस्वाल, शुबमन गिल आणि कर्णधार रोहित शर्माचीही बॅट बोलली. या तिघांना रोखण्याची योजनाच इंग्लंडकडे नव्हती. नवोदित सर्फराज खाननेही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आणि नवा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने त्याला चांगली फलंदाजी करता येते, हे दाखवून दिलं.

गोलंदाजीच्या आघाडीवरही जसप्रीत बुमराह, अश्विन आणि कुलदीप यादव यांनी कमाल केली. जडेजा, सिराजला फार बळी मिळवता आले नाहीत. आकाशदीप सिंगनेही खेळलेल्या एकमेव कसोटीत त्याच्या क्षमतेचा परिचय दिला.

मालिकावीर यशस्वी जयस्वाल ठरणार हे उघड गुपित होतं. मात्र, कुलदीप यादवची गोलंदाजी या मालिकेत कमाल होती. कुलदीपकडे गुणवत्ता असल्याबाबत दुमत नव्हतंच. मात्र, आता त्याने त्या गुणवत्तेला न्याय देणारी कामगिरी करून दाखवण्यास सुरुवात केली आहे.

काहीही झालं तरी आक्रमकच क्रिकेट खेळण्याचं बाझबॉल तंत्र घेऊन इंग्लंडचा संघ भारतात आला होता. पण त्यांचं ते तंत्र सपशेल अयशस्वी ठरलं आणि भारतानं मात्र एक जबरदस्त विजय मिळवला.

वेल प्लेड टीम इंडिया…!

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech