अबुजा- फ्रिकन देश नायजेरियामधील जुराक गावात हत्यारबंद हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले. हल्लेखोरांनी अनेक घरांना आग लावली, त्यानंतर गोळीबार केला. ही घटना नायजेरियाच्या उत्तर- मध्य भागात असलेल्या पठार राज्यात घडली. यावेळी अनेकांचे अपहरणही झाल्याचेही सांगण्यात येत आहे. याभागात शेतकरी आणि मेंढपाळ यांच्यात वारंवार हिंसाचार होत असतो.
याबाबत पठार पोलिसांचे प्रवक्ते आल्फ्रेड अलाबो यांनी सांगितले की, पठार बांगलाच्या जंगलात सुरक्षा दलाच्या हल्ल्यातून पळून गेलेल्या हल्लेखोरांनी सोमवारी रात्री उशिरा जुराक आणि डकई गावांवर हल्ला केला. यावेळी त्यांनी घरे जाळली. त्यानंतर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. या हल्ल्यात ४० लोकांनी आपले प्राण गमावले. यादरम्यान सुरक्षा दलाने सात हल्लेखोरांना ठार केले. तर पळून गेलेल्या टोळीतील सदस्यांनी नऊ जणांना ठार केले आणि सहा घरे जाळली. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. एका गावकऱ्याने सांगितले की, बंदूकधाऱ्यांनी कोणतीही दयामाया न दाखवता ४० हून अधिक लोकांची हत्या केली. मी कसातरी पळत जवळच्या गावात पोहोचलो. तेव्हापासून मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना पाहिलेले नाही.