मुंबई: मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर माझ्यासमोर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. नियतीने अशी वेळ कोणावरही आणू नये, असे वक्तव्य शिंदे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी केले. रवींद्र वायकर यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांचे हे वक्तव्य पाहता रवींद्र वायकर हे शरीराने शिंदे गटात आले असले तरी मनाने ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याच्या चर्चा होत्या. वायकर यांच्या वक्तव्याने त्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे शिंदे गटानेही वायकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे रवींद्र वायकर लोकसभेची निवडणूक किती इर्ष्येने लढतील, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रवींद्र वायकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मला चुकीच्या प्रकरणात गोवल्यानंतर माझ्याकडे गजाआज जाणे किंवा पक्ष बदलणे, हे दोनच पर्याय उरले होते. दबाव तर होताच, परंतु पत्नीचेही नाव गोवले गेल्यावर माझ्यापुढे पर्याय नव्हता. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कोणावरही येऊ नये, असे सांगत रवींद्र वायकर यांनी मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली.
माझ्या हातातील शिवबंधन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेपासून आहे व खांद्यावरचे शिवधनुष्यही. बाळासाहेबांच्या शिवसेनेत 50 वर्षे राहिल्यानंतर मला उद्धव ठाकरे यांची साथ सोडावी लागली, तेव्हा एखाद्या कुटुंबसदस्याला आपण पारखे होतो, तशीच माझी भावना होती. परंतु नियतीने माझ्यासमोर यक्षप्रश्न निर्माण करून ठेवला व नियतीच कसा बदल घडवून आणू शकते, ते सर्वांनीच पाहिले आहे, वायकर यांनी म्हटले.