पुणे, 14 फेब्रुवारी : रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणार्या फुकट्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्यापुणे विभागाकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम आखण्यात येते. त्यामुळे दर महिन्याला सरासरी २० हजारांच्या पुढे फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येते. तरीही तिकीट न काढता प्रवास करणार्यांची संख्या काही कमी होत नाही. पुणे विभागातील सर्व स्थानकांतील फुकट्या प्रवाशांवर केलेल्या कारवाईत पुणे रेल्वे विभागाला एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या दहा महिन्यांत २३ कोटी २९ लाख इतके उत्पन्न मिळाले आहे.
पुणे रेल्वे विभागातील पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर तिकीट निरीक्षकांकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम आखण्यात येते. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत यंदा विनातिकीट तपासणी मोहिमेतून तीन कोटी जास्तीचे उत्पन्न मिळाले आहे.
गेल्या आर्थिक वर्षांत दहा महिन्यांत पुणे विभागाला २० कोटी ४० लाख इतके उत्पन्न मिळाले होते. तर चालू वर्षी दहा महिन्यांत २३ कोटी २९ लाख इतके उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये जवळपास १४ टक्के जास्तीचे उत्पन्न मिळाली आहे. विशेष म्हणजे रेल्वेतून प्रवास करताना तिकीट दरापेक्षा दंडाची रक्कम जास्त असते, तरीही प्रवाशांकडून तिकीट न काढता प्रवास केला जातो. तसेच आरक्षित स्लीपर बोगीतून बेकायदेशीरपणे प्रवास करणार्या प्रवाशांची संख्यादेखील जास्त आहे.