(नारायण शेट्टी)
शहापूर: भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिवसभर शहापूर तालुक्याचा दौरा केला असून या दौऱ्यात त्यांनी वैयक्तिक भेटी गाठींवर भर दिला आहे.
शहापूर तालुक्याच्या दौऱ्याला त्यांनी वासिंद येथून सुरूवात केली असून वासिंद येथील सुमारे ६०० कुटुंबांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शहरातील प्रसिद्ध उत्तर महाराष्ट्र मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांशी कपिल पाटील यांनी संवाद साधला.
त्यानंतर त्यांनी आसनगाव, चेरपोली, आटगाव, खर्डी, पळशीण, बिरवाडी आदी भागात स्थानिक ग्रामस्थांबरोबरच डॉक्टर, वकील, व्यापारी आणि सिंधी, तेली, बोहरा, नाभिक समाजबांधव आदींशी संवाद साधला. दौऱ्या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली दहा वर्षांत केलेल्या कार्याबरोबर भिवंडी लोकसभा मतदारसंघात आपण केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा पाढा वाचून दाखविला.
आता पर्यंत शहापूर विधान सभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, महविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे आणि जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश सांबरे यांचे मेळावे झालेत. या मध्ये कपिल पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
या दौऱ्यात या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दौलत दरौडा, भाजपाचे शहापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अशोक इरनक, नंदकुमार मोगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश वेखंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोहर सासे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, मनसेचे तालुकाप्रमुख विजय भेरे आदींची उपस्थिती होती.