डोंबिवली- डॉ. श्रीकांत शिंदे याच्या रूपाने आपण आदर्श लोकप्रतिनिधी आणि आदर्श खासदार दिल्लीला पाठवला असल्याचे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवलीत काढले. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील आदी महायुतीच्या प्रमूख नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी दिलखुलासपणे खासदार डॉ. शिंदे यांनी दहा वर्षात केलेल्या विकासकामांचे कौतुक केले.
आज मी आपल्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्य नेता, या राज्याचा मुख्यमंत्री आणि तुमच्या खासदाराचा पिता म्हणून या ट्रिपल रोलमध्ये उभे आहोत. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कामाबद्दल समाधानी असून त्याची विकासाची गाडी राईट ट्रॅकवरच नाही तर फुल स्पीडमध्ये आहे. तर डॉ.श्रीकांत शिंदे आता केवळ खासदार नाही तर संसदरत्न असून त्याचाही आपल्याला अभिमान असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर कल्याण लोकसभेच्या मतदारसंघांनी त्याला खासदार म्हणून त्याला स्वीकारलेलं असून बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि मोदीजींनी ठेवलेला विश्वास आणि मतदारांचा आशीर्वाद तसेच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची घेतलेल्या मेहनतीमुळे डोंगराएवढी ही कामे करणे शक्य झाल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर चौफेर विकास कसा करायचा याची नस त्याला कळलेली असून आपण त्याला 2014 मध्ये निवडून दिलेत, 2019 मध्ये निवडून दिले आणि 2024 मध्येही पुन्हा निवडून देणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकांनी ठरवावे भविष्यात कसा विकास हवा आहे – खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. या १० वर्षात लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या १० वर्षांचे प्रगतीपुस्तक आज जनतेसमोर ठेवण्याचे काम करतोय, असे यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच आता लोकांनी ठरवायचे आहे, की भविष्यात आणखी कशा पद्धतीने विकास हवा आहे, असे आवाहन केले.यावेळी उपस्थित नागरिकांसमोर गेल्या दहा वर्षात लोकसभेत केलेल्या कामांचे मुख्यमंत्री आणि जनतेसमोर सादरीकरण करत कामांची सखोल माहितीही डॉ.शिंदे यांनी दिली. देशात रेल्वेचे सर्वाधिक काम २०१४ ते २०२४ या १० वर्षात झाले असून कल्याण लोकसभेतही मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचे यावेळी सांगितले. रेल्वेची पाचवी सहावी मार्गिका, कल्याण यार्ड रिमॉडेलिंग, सरकते जिने, होम प्लॅटफॉर्म अशा अनेक सुविधा देण्यासह रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी पक्क्या रस्त्यांचे जाळे तयार केल्याचे यावेळी सांगितले. रिंग रोड, विठ्ठलवाडी कल्याण उन्नत महामार्ग मोठागाव माणकोली पूल, ऐरोली काटई फ्री वे, तळोजा मेट्रो असे अनेक गेमचेंजर प्रकल्प कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात झाले, अशी माहिती यावेळी दिली. आरोग्य सुविधेतही कल्याण लोकसभेत सर्वोत्तम सुविधा दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. उल्हासनगरमधील मोफत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज, शासकीय रुग्णालयांमध्ये आधुनिक सुविधा पुरवणे अशी कामे केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
विरोधकांचा शेलक्या शब्दांत समाचार…
श्रीकांत शिंदे डॉक्टर असले आणि आपण डॉक्टर नसलो तरी आपण अनेक सर्जरी केलेल्या आहेत. काही लोकांचे गळ्याचे पट्टे गायब झाले, काही लोकं फास्ट फिरायला लागले, चालायला लागले, तेदेखील गरजेचे होते. जेव्हा आम्ही 2022 ला सरकार स्थापन केलं. त्यावेळची परिस्थिती आपल्याला माहीत आहे. शेवटी सहकार्य योगदान मागायचे असते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सहकार्य मागण्यासाठी कशाला काही वाटायला हवे. विकासासाठी आम्ही सहकार्य मागत असतो. मात्र अहंकारी लोकं आपल्या इगोसाठी राज्याचे नुकसान करतानाही आपण बघितल्याची टिकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाचेही नाव न घेता त्यांनी विरोधकांवर केली. तसेच तर खरे वाघ आम्हीच असून काही नकली वाघ कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले. परंतु हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर असून वाघाचे कातडे पांघरलेल्या शेळ्या आपण चांगल्याप्रकारे ओळखून असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समचार घेतला.
डॉ. शिंदे यांनी सेना भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे चीज केले – रविंद्र चव्हाण
गेल्या दहा वर्षांपासून शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली , त्या मेहनतीचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघात उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सेवांच्या माध्यमांतून चीझ केले. इतके वर्षे त्यांची एकनाथ शिंदे यांचे पुत्र अशी ओळख होती. मात्र त्यांनी आपल्या कामातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केल्याची कौतुकाची थाप सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिली. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण भाग जो आहे त्यात मध्यमवर्गीय कुटुंब सर्वाधिक आहेत. कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांच्या सर्व समस्या त्यांनी जाणून घेऊन इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नक्की काय केलं पाहिजे त्या कामांचा धडाका लावल्यामुळे तुमच्या आणि आमची सर्वांची जबाबदारी ही फार वाढल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचे काम – राष्ट्रवादी नेते प्रमोद हिंदुराव
भविष्याचा वेध घेण्याची किमया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी केली आहे, त्याला साथ देण्याचे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होत असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी यावेळी व्यक्त केले. गेल्या दहा वर्षांत त्यांनी केलेल्या विकासकामाची पोचपावती या पुस्तकाच्या रूपाने आपल्याला दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात कामे करण्याला प्राधान्य दिले आहे. तर एमएमआरडीएप्रमाणे कल्याण आणि त्याच्या आसपासच्या परिसरासाठी प्राधिकरण करावे अशी मागणी हिंदुराव यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
श्रीकांत शिंदे हे हॅटट्रिक मारणार – मनसे आमदार राजू पाटील
या ट्रीपल इंजिन सरकारला आता मनसेचे खरे इंजिन लागले असून आता तर ही महायुती आणखीनच स्पीड पकडेल. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे हे येत्या निवडणुकीत नक्कीच तिसऱ्यांदा हॅटट्रिक मारतील असा ठाम विश्वास यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला. खासदार डॉ. शिंदे यांना जशी हनुमान चालीसा पाठ आहे तशीच कल्याण लोकसभेत त्यांनी केलेली सर्व कामेही पाठ आहेत. त्यांचे निश्चितच कौतुक केले पाहिजे असे सांगत मनसे संपूर्ण ताकदीने काम करून विजयापर्यंत पोहचण्यासाठी आमचा खारीचा वाटा उचलू अशी ग्वाही मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री मा. ना. रवींद्र चव्हाण साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, मनसेचे आमदार राजू पाटील, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे, रिपाई आठवले गटाचे प्रल्हाद जाधव, रिपाई जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, पीआरपी कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, स्टार प्रचारक राहुल लोंढे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, राष्ट्रवादी प्रदेश सचिव भरत गंगोत्री, महिला आघाडी जिल्हाप्रमुख लता पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.