(सिध्दार्थ गायकवाड)
कल्याण – टिटवाळा नजीक असणाऱ्या एकूण ८ ठिकाणी बंदी घालण्यात आलेल्या मंगुर माश्यांच्या शेती असणाऱ्या तलावाचे दुषीत पाणी काळू नदीत सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचा अहवाल केडीएमसीने तयार केला आहे. याबाबत केडीएमसी उप अभियंता यांच्या अहवालानुसार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ व लघुपाटबंधारे विभागाला पत्र दिले असून यामुळे नदी प्रदूषण प्रश्न ऐरणीवर आल्याने यावर कारवाई कोण करणार असा सवाल उपस्थित केला गेला आहे .
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बहुतांश तळे हे नदीकिनारी स्थित असून, ह्या मत्स्य पालना साठी नदीपात्रातून अवैध्यरित्या पाणी उपसा केला जातो. तलावांमध्ये मंगुर माश्यांकरीता खाद्य म्हणून सर्व प्रकारच्या माशांचे तुकडे टाकण्यात येतात व त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येते. तसेच महिना भराच्या कालावधीनंतर तलावात साठलेले दुषित पाणी काळू नदीत सोडण्यात येते. या दुषित पाण्यामुळे पाण्याला वास येतो व त्याचा परिणाम पाणी वितरणावर मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे ही तळी ओव्हरफ्लो होतात आणि मंगुर मासे नदीपात्रात येतात. त्यामुळे नदीपात्रातील इतर प्रजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो.
जगभरातील बहुतेक सर्वच देशांनी हा भयंकर धोका लक्षात घेत, मंगुर मत्स उत्पादन त्यांच्या देशात बंद केले आहे. तर भारतात ही २००० सालापासून राष्ट्रीय हरित प्राधिकरणा मार्फत, मंगुर माश्यांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. असे असून देखील टिटवाळा नजीक सर्रासपणे मंगुर माशांचे उत्पादन घेतले जात आहे. ही धक्कादायक बाब आहे. टिटवाळा नजीक मंगूर माशाचे मस्त्य पालन केले जात असल्याबाबत आणि या तळ्याचे दुषित पाणी नदीपत्रात सोडले जात असल्याचा अहवाल केडीएमसी उप अभियंता यांनी एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर यांच्या निर्दशनास आणून दिल्या नंतर एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर पाणी पुरवठा यांनी परिमंडळ १ उप आयुक्त, प्रदूषण महामंडळ आणि लघु पाटबंधारे विभागाला पत्र पाठवत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या काळू नदीवरील टिटवाळा येथील जलशुध्दीकरणामार्फत टिटवाळा गांव परिसरात पाणी वितरीत करण्यात येत आहे. सद्यस्थितीत काळू नदीतील पाण्याचे निरिक्षण केले असता पाण्याला वास येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत चौकशी केली असता रूंदे फळेगांव रोडवरील एका फार्म हाऊसच्या पुढे रस्त्याच्या डाव्या बाजुस श्री स्वामी समर्थ मंदिरालगत असणाऱ्या एका छोटया तलावामध्ये मंगुर माश्यांची पैदास केली जात असल्याचे व अश्या प्रकारचे एकुण ८ तलाव या भागात आहेत असा उप अभियंता यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे.