गुढीपाडव्याच्या दिवशीच शेतकऱ्यांवर आसमानी संकट

0

ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि गारांचा पाऊस

अमरावती –  गुढीपाडव्याच्या दिवशीच राज्यातील 3 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलं आहे. महाराष्ट्रातील वर्धा, जळगाव आणि अमरावती या 3 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे काही भागात गारांचादेखील पाऊस पडला आहे. वर्धा शहरासह जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस बरसला. त्यानंतर आज सकाळी विविध भागात पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्यात. मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. मध्यरात्रीच्या सुमारास वर्धा शहरात गारपीटही झाली. अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळालाय. पण शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस, गारपीटमुळे उन्हाळी पिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर भागात यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गारपीटमुळे तीळ, कोहळ, टरबूज, लिंबू यासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

जळगावच्या जामनेर येथे अवकाळी पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका बघायला मिळतोय. तर दुसरीकडे अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पार झाला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. जळगाव जिल्ह्यातील इतरही काही भागात अवकाळी पाऊस पडला. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला रब्बी हंगामातील गहू तसेच हरभरा आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात आज सकाळी गारपीटसह वादळी वाऱ्याचा पाऊस पडला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. चांदुर बाजार तालुक्यातील गहू, संत्रा, कांदा यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. थुगाव आणि पिपरीमध्ये गारपीटाने झाल्याने संत्रा, गहू, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसावर प्रतिक्रिया दिली आहे. “अवकाळी पाऊस, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, चाऱ्याच्या प्रश्नासंदर्भात बोललो आहे. मुख्य सचिव, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कामं होतील, त्यांना सूचना दिल्या आहेत. कुठे काही कमी पडणार नाही, याची काळजी घेऊ. आम्ही नुकसान भरपाई देण्याचे काम करु. पंचनामे करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, निवडणुका होत राहतील”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech