उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध ……डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही

0

उल्हासनगर : कल्याण लोकसभेचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यापाऱ्यांशी बोलताना व्यक्त केला. तर मागील निवडणुकीपेक्षाही जास्त मताधिक्याने यंदा तुम्हीच विजयी व्हाल, असा शब्द व्यापाऱ्यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी ‘व्यापारी शहर’ अशी ओळख असलेल्या उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यांशी, तसेच विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संवाद साधला. यामध्ये इलेक्ट्रॉनिक बाजार असोसिएशन, प्रेस बाजार असोसिएशन, फर्निचर मार्केट व्यापारी संघटना, ज्वेलर्स व्यापारी आणि शहरातील इतर व्यापाऱ्यांचा समावेश होता. या व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जाणून घेतल्या. तसेच भविष्यात या समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांना दिले. उल्हासनगर शहरासाठी महायुती सरकारने आत्तापर्यंत भरघोस निधी दिला असून त्यातून शहरात भुयारी गटार योजना, कॅशलेस हॉस्पिटल, कामगार हॉस्पिटल, चांगल्या दर्जाचे रस्ते अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. आगामी काळात उल्हासनगर शहरासाठी स्वतंत्र जलस्रोत तयार करणे आणि शहरातील पार्किंगची समस्या प्रामुख्याने सोडवणे यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

उल्हासनगर शहरातील रहिवासी आणि व्यापारी यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या अनधिकृत इमारतींच्या प्रश्नाबाबत महायुती सरकारने पुनर्विकास आणि नियमितीकरणाचे धोरण आणले असून यामुळे शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. २०१४ आणि २०१९ सालच्या निवडणुकीत उल्हासनगर शहरातील नागरिक आणि व्यापारी महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्यामुळेच आपण शहरात भरघोस कामे करू शकलो. हाच विश्वास येत्या निवडणुकीतही कायम ठेवावा आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करावे, असे आवाहन यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

तर व्यापारी वर्गाकडूनही ठिकठिकाणी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. मागील दोन निवडणुकांपेक्षाही जास्त मताधिक्याने यावेळेस तुम्हाला निवडून देऊ, असा विश्वास व्यापारी वर्गाने व्यक्त केला. उल्हासनगर शहराच्या या दौऱ्यात भाऊ परसराम झुलेलाल मंदिरात जाऊन परमपूज्य श्री झुलेलाल महाराज यांचेही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. याप्रसंगी बोलताना आपले नाते हे फक्त खासदार आणि मतदार इतकेच नसून सुखदुःखाचे भावनिक नाते असल्याची भावना श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच आगामी चेटीचंद उत्सवाच्याही सिंधी बांधवांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, विधानसभा अध्यक्ष जमनू पुरस्वानी, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मढवी, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर यांच्यासह पदाधिकारी, व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

——–

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech