जंगलातील कृत्रिम पक्षी उद्यानाला स्थानिक नागरिकांचा विरोध
ठाणे : पातलीपाडा येथील डोंगरावरील १५ एकर नैसर्गिक जंगलाला नेट लावून बंदिस्त पक्षी उद्यान (आयव्हरी पार्क) तयार करण्याच्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या ७० एकरापैकी ५५ एकरावर अतिक्रमणे झाल्यानंतर, रहिवाशांनी वृक्षारोपण व संवर्धन करून जोपासलेल्या जंगलाला वाचविण्याचा निर्धार केला आहे. भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन कृत्रिम पक्षी उद्यानाऐवजी `नैसर्गिक जंगल बचाओ’चा नारा दिला.
ठाणे नगर विकास आराखड्यानुसार, पातलीपाड्यातील सर्वेक्षण क्रमांक २८५/२, २७१, आणि १३९ (सुमारे ७० एकर) राखीव जंगल म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु, या भागात २००८ पासून अतिक्रमणे सुरू झाली. या संदर्भात हिरानंदानी इस्टेटसह अन्य वसाहतीतील रहिवाशांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु, ठोस कारवाई न झाल्यामुळे, २०११ मध्ये या जमिनीचे राखीव जंगल म्हणून संरक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या भागातील अतिक्रमणे थांबविण्याबरोबरच क्षेत्राचे संवर्धन करण्यासाठी रहिवाशांनी झाडे लावण्याची सातत्यपूर्ण मोहीम हाती घेतली. या प्रयत्नांमुळे गेल्या १३ वर्षात १५ एकर मोकळ्या जमिनीत ५ हजारांहून अधिक स्थानिक झाडांचे संपन्न जंगल तयार झाले आहे. त्याचबरोबर ते पोपट, घार यांच्यासह स्थानिक व परदेशी पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान बनले आहे.
या १५ एकर जंगलाच्या क्षेत्राला संपूर्ण जाळीने (नेट) संरक्षित करून पक्षी उद्यान (आयव्हरी पार्क) साकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या पक्षी उद्यानात बाहेरुन आणलेले पक्षी सोडले जाणार आहेत. नेटचे आच्छादन असल्यामुळे ते बाहेर पडू शकणार नाहीत. त्यामुळे स्थानिक पक्ष्यांचा अधिवास संपुष्टात येईल. यापूर्वी राज्य सरकार व ठाणे महापालिकेने साकारलेल्या अनेक प्रकल्पांची दुरवस्था आहे. कळवा खाडी किनाऱ्यावरील डॉ. सलीम अली उद्यानाची दुरवस्था झाली. महापालिकेने उभारलेले `नवे ठाणे, जुने ठाणे’ प्रकल्पही भ्रष्टाचाराच्या गर्तेत गेला. तुर्फेपाडा येथे उभारलेल्या अर्बन फॉरेस्टला आग लागल्याचा प्रकार घडला.
या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे मध्यरात्री मद्यपींच्या पार्ट्या रंगतात. या पार्श्वभूमीवर पक्षी उद्यानाची दुरवस्था झाल्यास, संवर्धन केलेल्या १५ एकरावरील जंगलाचे नुकसान होईल, अशी भीती माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासह रहिवाशांनी व्यक्त केली. तर संरक्षित जंगल बचाओचा नारा दिला. दरम्यान, या परिसराला महापालिकेचे सहायक संचालक (नगर रचना) संग्राम कानडे, कार्यकारी अभियंता पाडगावकर, सर्व्हेअर शेलार यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या भागातील रहिवाशांकडून सोमवारी पुन्हा महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यात येणार आहे.