राडा पालकमंत्र्यांचा

0

नितीन सावंत

राज्यात महायुती सरकारला मोठे बहुमत मिळूनही सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीतील कटकटी वाढतच आहेत. सुरुवातीला मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे अडून बसले होते. त्यामुळे भाजप विधिमंडळ नेत्याचे नाव जाहीर करण्यास विलंब झाला. मात्र एकनाथ शिंदे यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवत अखेर मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात घालण्यात आली. त्यानंतर खाते वाटपावरून जोरदार घमासान महायुतीत घडले होते. मात्र एकनाथ शिंदे नगर विकास खात्यासाठी अडून बसले होते. त्यांना गृह खाते मिळणार नाही हे माहीतच होते परंतु नगर विकास खाते गेले तर आपल्याला फारशी किंमत राहणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संधान साधून नगर विकास खाते मिळवले. त्याचबरोबर गृहनिर्माण हे खाते मिळवण्यात त्यांना यश आले.

भाजपचे दुसरे साथीदार अजितदादा पवार हे मात्र शांतपणे आपल्याला पाहिजे ते मिळवत होते. त्यांनी शिंदेसेनेकडील एक्साईज हे महत्त्वाचे खाते खेचून घेतले. एक्साईज खात्याच्या भ्रष्टाचाराबाबत मोठ्या तक्रारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्या होत्या. तत्कालीन एक्साईज खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांना आता पर्यटन खाते देण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिलेदार नाराज होते. परंतु भाजपने एकनाथ शिंदे यांच्या सेनेला नगर विकास आणि गृहनिर्माण हे दोन खाती देऊन फारसे महत्त्व न देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी भाजपला आता शिंदे सेनेची फारशी गरज उरलेली नाही त्यामुळे दोन एक वर्ष त्यांचे लाड करून त्यांची जागा त्यांना दाखवण्यात येईल. खाते वाटप झाल्यानंतर गेले अनेक दिवस पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्यास विलंब होत होता. अखेर पालकमंत्री पदाचे वाटप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला निघून गेले.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हा आपल्या ताब्यात राहावा यासाठी पालकमंत्री पदाचा हट्ट करून आपल्या मुलीसाठी पालकमंत्री पद मिळवले. परंतु रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे विरुद्ध सर्व पक्ष अशी परिस्थिती आहे. नुकतेच मंत्री झालेले भरत गोगावले हे तर पालकमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसले होते. परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला. आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला शिंदे सेनेच्या रायगड जिल्ह्यातील सर्व आमदारांनी आक्षेप घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत पालकमंत्री पद शिंदे सैनेकडे राहावे हा त्यांचा आग्रह आहे. पालकमंत्री पद तटकरे कुटुंबीयांकडे गेल्यामुळे शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी रायगड मध्ये जोरदार आंदोलन केले आणि आपला संताप व्यक्त केला. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात जोरदार संघर्ष आहे. त्यामुळे नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. तरीसुद्धा रायगड आणि नाशिक या दोन पालकमंत्रीपदांना मुख्यमंत्र्यांनी परदेशात बसून स्थगिती दिली.

परंतु रायगडच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा झाल्यामुळे आता येथे गोगावले आणि तटकरे या दोन्ही मंत्र्यांना डावलून तिसराच मंत्री येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा आता भाजपच्या पथ्यावर पडला आहे. खरे म्हणजे जळगावचे पालकमंत्री पद गिरीश महाजन यांना हवे होते. ते शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले आहे. उद्या नाशिकचे पालकमंत्री पद दादा भुसे यांना दिले तर जळगावचे पालकमंत्री पद गुलाबराव पाटील यांना सोडावे लागेल. त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची जरी नाशिकचे पालकमंत्री पद मिळवण्याची इच्छा असली तरी ते त्यांना मिळण्याची शक्यता फारच धूसर आहे.

कोल्हापूरचे पालकमंत्री पद शिंदे सेनेच्या वाट्याला आले आहे. नवीन मंत्री प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळाले आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांची लाही लाही झाली आहे. कारण आपण एवढे सीनियर मंत्री असताना आपली वर्णी वाशिम या विदर्भातील जिल्ह्यात लावली आहे अशी खंत त्यांना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवले आहे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मुंबई शहर अशी दोन पालकमंत्री पदे स्वतःकडे ठेवली आहेत. अजितदादा यांनी नेहमीप्रमाणे पुण्याचे पालकमंत्री पद मिळवून आब राखली आहे. बहुचर्चित बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदही अजितदादांनी स्वतःकडे ठेवले आहे. भविष्यात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीन चीट दिल्यानंतर बीडचे पालकमंत्री पद त्यांना सोपवण्यात येईल. पंकजा मुंडे यांनीही बीडचे पालकमंत्री पद मिळण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती मात्र हे राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्याने त्यांना मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.

नितीन सावंत, ९८९२५१४१२४

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech