नवी दिल्ली : कोलकाता येथीआरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात २९ जानेवारी रोजी सुनावणी करेल. सरन्यायमूर्तींच्या अध्यक्षतेतील खंडपीठाने सर्व पक्षांच्या वकिलांच्या उपस्थितीत यावर सुनावणी होईल असे स्पष्ट केले आहे. पश्चिम बंगालच्या सियालदाह न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी, महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील अत्याचाराच्या प्रकरणात दोषी संजय रॉय यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांनी हा निकाल दिला. दोषी संजय रॉय याला भारतीय दंड संहितेच्या कलम ६४(बलात्कार), ६६ (बलात्कारानंतर मृत्यू) आणि १०३ (१) (खून) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत होती. गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमधून एका महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी संजयला अटक करण्यात आली. या प्रकरणात ५१ जणांचे जबाब नोंदवण्यात आले होते.