प्रयागराज : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी आज सपत्नीक महाकुंभ मेळ्याला हजेरी लावली. याप्रसंगी अदानी यांनी स्वतःच्या हाताने शिरा-पुरी बनवून भाविकांना प्रसाद म्हणून वाटली.गौतम अदानी सुमारे दीड तास महाकुंभमेळ्यात होते. या दरम्यान त्यांनी इस्कॉनच्या श्रीकृष्ण मंदिरात आरती केली. त्यानंतर त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन डाळ, सोयाबीन आणि बटाट्याची भाजी, चपाती, पुरी आणि शिरा आदि पदार्थ बनविण्यास मदत केली. हा भोजन प्रसाद त्यांनी आपल्या हाताने भाविकांना वाटला.इस्कॉन मंदिरातून ते संगमावर गेले.तिथे त्यांनी पत्नी प्रीती अदानी यांच्यासह गंगापूजा केली. गौतम अदानींच्या पुत्राचा येत्या ७ फेब्रुवारी रोजी विवाह होणार आहे. हा विवाह सोहळा सर्वसामान्यांप्रमाणे होईल,असे अदानी यांनी येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.