मुंबई – मुंबई उपनगरातील भांडुप परिसरात असणाऱ्या ड्रीम्स मॉलमध्ये आज सकाळी १० वाजताच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाला लागून असलेला ड्रीम्स मॉल गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास बंद पडलेल्या अवस्थेत आहे. या मॉलमध्ये मोजकीच दुकाने आणि कॉल सेंटर आहेत. त्यामुळे या मॉलमध्ये लोकांची वर्दळ नसते. या मॉलच्या तळमजल्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्या पाण्यात मॉल कर्मचाऱ्यांना साधारण ३० ते ३५ वयोगटातील गुलाबी रंगाचा ड्रेस आणि पांढरी ओढणी परिधान केलेल्या महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. मॉलच्या कर्मचाऱ्यांनी भांडूप पोलिसांना त्वरित याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन, शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात पाठवला. या मृत महिलेची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. भांडूप पोलिसांनी महिलेच्या अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.