प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
मुंबई : अनंत नलावडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर झालेल्या वैयक्तिक टिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी पत्रकार परिषद घेत तीव्र शब्दांत निषेध केला.”तटकरे कुटुंबीयांबद्दल वापरण्यात आलेली भाषा अशोभनीय, निंदनीय आणि महायुतीच्या धर्माला गालबोट लावणारी असल्याने अशा प्रकारची टिका कदापि सहन केली जाणार नाही,” असा इशारा राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी यावेळी दिला. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी व जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध दर्शवत तीव्र शब्दात टिका केली होती.त्यावर प्रत्युत्तर देताना परांजपे म्हणाले, “महायुतीतील घटकपक्षांनी असंतोष असल्यास तो पक्षप्रमुखांकडे मांडला पाहिजे.सार्वजनिक ठिकाणी अशा टिकेने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतो.”
परांजपे यांनी शिवसेना नेते व मंत्री भरत गोगावले यांच्या आंदोलन शैलीवरही आक्षेप घेतला.”संविधानिक पदावर असून टायर जाळणे आणि रास्ता रोको करणे हे कायदा व सुव्यवस्थेला धक्का देणारे कृत्य आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते असताना त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये,” असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. “अदिती तटकरे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून मंत्रीपदापर्यंत उत्तम कामगिरी केलेली असून त्या नैसर्गिक आपत्तीवेळी स्वतः फिल्डवर उतरून लोकांची मदत करतात.त्यांनी ‘माझी लाडकी बहिण’ योजनेतून २ कोटी ३५ लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ पोहोचवला.अशा कर्तृत्ववान महिलांवर अशोभनीय टिका खपवून घेतली जाणार नाही,”या आपल्या इशाऱ्याचा परांजपे यांनी पुनरुच्चार केला.
रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांबाबत नाराजी व्यक्त झाली असली तरी “मुख्यमंत्री दावोसहून परतल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यावर तोडगा काढतील,” असे परांजपे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.