मुंबई- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारीसाठी गुजरातमधून आणलेली ‘मानस’ आणि ‘मानसी’ ही सिंहाची जोडी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीमध्ये १४ वर्षांनंतर एका सिंहीणीने गोंडस छाव्याला जन्म दिला आहे. सिंह सफारीच्या ‘मानसी’ या सिंहिणीने गुरुवारी रात्री एका छाव्याला जन्म दिला.
संजय गांधी उद्यानाचे संचालक जी.मल्लिकार्जुन, विभागीय वन अधिकारी रेवती कुलकर्णी, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले, वनपरिक्षेत्र अधिकारी निकेत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यक डॉ.विनया जंगले आणि त्यांच्या टीमने ‘मानस’ आणि ‘मानसी’ यांच्या मिलनसाठी प्रयत्न सुरू केले. सप्टेंबर, २०२३ साली त्याला यश मिळाले. ३० सप्टेंबर रोजी या जोडीचे शेवटचे मिलन पार पडले. त्यानंतर प्रतीक्षा सुरू झाली.ऑक्टोबर महिन्यापासून ‘मानसी’ गरोदर असल्याची लक्षणे पशुवैद्यकीय चमूला आढळून आली. नोव्हेंबर, २०२३ साली तपासणी केल्यानंतर ती गरोदर असण्यावर शिक्कामोर्तब झाले.
मिलनानंतर जवळपास १०८ दिवसांनी गुरुवार १६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता ‘मानसी’ने गोंडस छाव्याला जन्म दिला. महत्त्वाचे म्हणजे १६ जानेवारी रोजीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. सध्या या दोघांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने वन कर्मचाऱ्यांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. पिल्लू हे सुखरूप असून त्याचे वजन १ किलो ३०० ग्रॅम एवढे आहे.