मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर आज, गुरुवारी पहाटे २ वाजेच्या सुमाराला धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. अभिनेत्याच्या वांद्र परिसरातील घरात हा हल्ला झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. यासंदर्भातील प्राथमिक माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीने अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्या मोलकरणीशी वाद घातला. त्यावेळी सैफने मध्यस्थी करून त्या माणसाला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफला गंभीर अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अभिनेता सैफ आपल्या कुटुंबासोबत वाद्रे येथील अपार्टमेंटमध्ये १२ व्या मजल्यावर राहतो. लिलावतीमध्ये सैफ अलीवर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सैफला झालेली दुखापत गंभीर नाही. त्याला चाकू लागला की, हाणामारीत तो जखमी झाला याची माहिती घेतली जात आहे. या हल्ल्यात सैफची पत्नी करीना कपूर आणि त्यांची मुले सुरक्षित आहेत. या घटनेवर कुटुंबाने अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान चौकशीसाठी सैफच्या घराभोवती बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.