रत्नागिरी : रत्नागिरीची आकांक्षा कदम राज्य कॅरम स्पर्धेत विजेती पद मिळवत दमदार कामगिरी सादर केली. मुंबईतील घाटकोपर जॉली जिमखाना आयोजित दुसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या महिलांच्या अंतिम सामन्यात तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्या मिताली पाठकला २५-१९, १२-२१, २५-१३ असे पराभूत करून या गटाचे विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या महिलांच्या लढतीत मुंबईच्या रिंकी कुमारीने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला २५-५, १५-२२, २५-५ असे पराभूत केले. महिलांच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी मिताली पाठकने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला २१-१४, १६-१७, २१-२० असे तर आकांक्षाने मुंबईच्या रिंकी कुमारीवर २४-१४, २५-१४ अशी मात केली होती.
विजेत्यांना घाटकोपर जॉली जिमखान्याचे मानद सचिव मुकेश बदानी व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांच्या शुभ हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी राज्य कॅरम संघटनेचे खजिनदार अजित सावंत, मुंबई उपनगर जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण तसेच घाटकोपर जॉली जिमखान्याचे खजिनदार बलवंत संगरका व मिकीन सेठ, ट्रस्टी मारिश गांधी व नीलकंठ सेठ,स्पोर्ट्स समन्वयक प्रशांत कार्या व स्पर्धा समन्वयक नलिन मेहता उपस्थित होते.