दीड कोटी रुपयांसाठी संतोष देशमुखांची हत्या झाली – आमदार सुरेश धस

0

संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी धाराशीवमध्ये मोर्चा

धाराशिव : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली. तसेच त्यांनी आकाच्या आकाला जेलमध्ये टाका अशी मागणी केली. तर आकाचा आका म्हणतो, माझा काही संबंध नाही, पण खरा सुत्रधार तोच असल्याचेही ते म्हणाले. आरोपींनी संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केली. त्या घटनेचा व्हिडीओही काढला. दुसरीकडे आका सांगत होता आणखी मारा. संतोष देशमुख याला का मारले? तर खंडणीच्या मध्ये तो आला होता. संतोष देशमुख यांची हत्या दीड कोटी रुपयांसाठी झाली. कारण ५० लाख या लोकांनी निवडणुकीत घेतले होते. दलित व्यक्तीला वाचवण्यासाठी संतोष देशमुख मध्ये आले. त्यामुळे त्याला मारले. अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला हवा. बार्शी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचा प्रमुख उद्देश संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देणे हा होता. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव जमा झाले होते.

तुम्ही आमच्या संतोषला १०० तोंडात मारुन माघारी पाठवायचं ना. यातील घुले नावाचा आरोपी म्हणाला होता, संतोषने माझ्या दोन तोंडात मारल्या आहेत, त्याच्या अगोदर संतोषच्या तोंडात मारली असती. याचे कपडे काढून हिंडवेन असं म्हटलं होतं. तुम्ही कपडे काढून धिंड काढायला हवी होती, पण अशा प्रकारे मारायला नको होतं. आम्ही धिंड काढलेली मान्यही केलं असतं. पण तुमच्या मनगटात जोर आला आहे, पैसा जास्त झाला आहे, तुम्हाला पैशाचा माज आला आहे. आम्ही तुमचा माज पाहिला असता आणि शांतपणे सहन केला असता. पण तुम्ही आमच्या संतोषला अशा पद्धतीने मारलं, असा संताप धस यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे सोमनाथच्या बाबतीतही तेच घडलं आहे. एका अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. पण सोमनाथच्या कुटुंबाने सेवेतून काढून टाकण्याची मागणी केली आहे. संतोष देशमुखला सलग चार तास मारहाण करण्यात आली. या दरम्यान तो सतत याचना, विनंती करत होता. मी तुमचं नाव कोणाला सांगणार नाही, मला मारु नका असं तो सांगत होता. मला फक्त पाणी पाजा असंही म्हणत होता. पण यांनी त्याला पाण्याऐवजी दुसरं काहीतरी पाजलं, ज्याचा मी उल्लेखही करु शकत नाही, असे आमदार सुरेश धस म्हणाले. धायमोकलून रडत होता तो माणूस, त्याचे व्हिडीओ काढून दुसऱ्याला दाखवले जात होते. बघा आम्ही कसं मारत आहोत सांगत होते. समोरुन आका फार चांगलं मारत आहात, अजून मारा असं सांगत होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech