संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठ आरोपींवर मोक्का

0

– कृष्णा आंधळे अद्याप फरार, वाल्मिक कराडला वगळले

बीड : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर याआधी देखील वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच यातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान यातील आरोपींवर कोणत्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याची माहिती मागवण्यात आली आहे. हे गुन्हे किती गंभीर स्वरूपाचे याची पडताळणी केली जातं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आतापर्यंत सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे या आठ जणांना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान या आठ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा शोध बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची तिन्ही पथक घेत आहेत. तसेच वाल्मिक कराड हत्येतील आरोपी नसल्याने त्याच्याविरोधात मोक्का लावण्यात आलेला नाही.

महेश सखाराम केदार याच्यावर धारूर पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे असून त्यात मारामारी, चोरी दुखापत करणे तर २०२३ मध्ये खुनाचा प्रयत्न करणे, असे गुन्हे आहेत. त्याबरोबरच सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सहभागाचा त्याच्यावर गुन्हा दाखल असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. तर मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर १० वर्षांत १० गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात घुलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. केज पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे असून मारहाणीचे चार, चोरीचा एक, अपहरणाचा एक तर २०१९ मध्ये खंडणीचा एक गुन्हा आहे. अंबाजोगाई शहरात फूस लावून पळवण्याचा गुन्हा नोंद आहे.

प्रतीक भीमराव घुले हा २४ वर्षाचा तरुण असून त्याच्यावर २०१७ ते २०२४ या आठ वर्षांमध्ये केज पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात मारहाण करणे, दुखापत करणे, गर्दी मारामारीत सहभाग आणि संतोष देशमुख यांच्या खुनात सहभाग असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. जयराम माणिक चाटे हा २१ वर्षाचा असून त्याच्यावर २०२२ ते २०२४ या तीन वर्षांत तीन गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक गुन्हा, केज पोलीस ठाण्यात दुखापतीचा एक गुन्हा, तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

या प्रकरणातील आरोपी कृष्णा शामराव आंधळे हा अद्याप फरार असून २०२० ते २०२४ या चार वर्षात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात गर्दी जमवणे, मारामारीचे तीन गुन्हे तर २०२३ मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. शिवाय अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये खंडणीचा एक गुन्हा तर केज ठाण्यात २०२४ मध्ये संतोष देशमुख यांच्या खुनात आरोपी असून तो सध्या फरार आहे. तर सुधीर सांगळे हा देशमुख हत्या प्रकरणात खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

तपासाबाबत वेळोवेळी आम्हाला माहिती द्यावी – वैभवी देशमुख
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाची माहिती आमच्यासह संपूर्ण राज्याला द्यायला हवी, अशी विनंती संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने सरकारकडे केली आहे. माझे वडील संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊन एक महिना झाला. या प्रकरणात पोलीस त्यांचा तपास करत आहेत, परंतु त्याबाबत आम्हाला कुठलीही माहिती दिली जात नाही. या प्रकरणात नेमकं चाललंय काय तपास कुठपर्यंत आलायं हे देशमुख कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्राला कळायला हवं ही माझी विनंती आहे. या गुन्ह्यातील तपासाबाबत वेळोवेळी आम्हाला माहिती द्यावी, अशी विनंती वैभवी देशमुखने केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech