नवी दिल्ली : गुजरातच्या पोरबंदर विमानतळावर ५ जानेवारी रोजी भारतीय तटरक्षक दलाचे ध्रुव-एमके हेलिकॉप्टर कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला होता. दुहेरी इंजिन असलेल्या या हेलिकॉप्टरच्या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) स्वदेशी बनावटीच्या या हेलिकॉप्टरची उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमधील आणखी एका घटनेत पोरबंदरहून निघालेले ध्रुव हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळले होते. यात तटरक्षक दलाचे २ पायलट आणि एका एअरक्रू डायव्हरचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे ५ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षा तपासणीसाठी सशस्त्र दलांनी त्यांच्याकडील सर्व ३३० एएलएच हेलिकॉप्टची उड्डाणे तात्पुरती थांबवली आहेत. यासंदर्भात एचएएचने सर्व ऑपरेटर्सना पुढील सुचनेपर्यंत ही हेलिकॉप्टर्स न उडवण्याचे निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तटरक्षक दलाच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरच्या एफडीआर (फ्लाइट डेटा रेकॉर्डर) आणि सीव्हीआर (कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर) डेटाच्या प्राथमिक विश्लेषणातून असे दिसून आले आहे की ते क्रॅश होण्यापूर्वी पायलटांनी हेलिकॉप्टरवरील नियंत्रण गमावले होते. यापूर्वी जून २०२१ मध्ये एचएएलकडून दाखल झालेल्या एएलएच मार्क-३ हेलिकॉप्टरने ९० मिनिटांचे सराव उड्डाण पूर्ण केले होते. तसेच ५.५ टन वजनाच्या या हेलिकॉप्टरने २०० फूट उंचीवर घिरट्या घालत असताना पायलटांच्या नियंत्रण सूचनांना प्रतिसाद दिला नाही. परिणामी ते नंतर जमिनीवर कोसळले आणि त्याला आग लागली. या दुर्घटनेत कमांडंट सौरभ आणि डेप्युटी कमांडंट एस के यादव हे दोन्ही पायलट आणि एअर क्रू डायव्हर मनोज प्रधान नाविक यांचा मृत्यू झाला होता.