स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याने अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात – अरविंद सावंत

0

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलताना स्वबळाचा नारा दिला. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अरविंद सावंत यांनी लोकसभा आणि विधानसभेला स्वबळाची आवश्यकता होती, असे म्हटले आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये संधी द्यायची असते. कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल आणि त्रांगड होत असेल, अडचणी निर्माण होत असतील तर स्वावलंबी व्हावं. स्वबळावर लढावं, या संदर्भात संजय राऊत यांची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.

सावंत पुढे म्हणाले, आमच्याकडे काही शिवसैनिक म्हणतात एकटे लढलो असतो तर २० पेक्षा अधिक आलो असतो असं म्हणतात. उद्धव ठाकरे एकटे होते, युती तुटली होती, कोणी बरोबर नव्हते. आठवले, जानकर सोडून गेले होते, विधानसभा निवडणुकीत एकटं लढल्यानंतर ६३ आमदार निवडून आले होते. तो अनुभव गाठिशी आहे. निश्चितपणे लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल लोकांमध्ये सद्भाव आहे. एकटं लढलं की अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात, असंही सावंत म्हणाले.

राऊत म्हणाले होते की, नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू मित्र नसतो. राजकारणात काही असंभव नसतं, असंही राऊत म्हणाले. एकदा आम्हाला पाहायचं आहेच, जे काही होईल ते होईल. आमचं असं ठरतंय की मुंबई, ठाणे, नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार याचा विचार करावा लागेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech