पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी तातडीने भूसंपादन करण्यात येणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून करण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश दिले आहेत. विमानतळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट – डीपीआर) येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत अंतिम करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रस्तावित विमानतळाचे लवकरच ‘टेक ऑफ’ होईल, असा दावा केला जात आहे. राज्यातील विमानतळ, विमानसेवा आणि विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. त्यामध्ये विमानतळाच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस भारतीय विमानतळ प्राधिकरण, सैन्य दल, महाराष्ट्र विमानतळ महामंडळाचे आणि राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.