अमरावती : मध्य भारतातील पहिली हत्ती सफारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत कोलकास येथील हत्तिणी १० ते २५ जानेवारी दरम्यान रजेवर गेल्या आहेत. वनअधिकाऱ्यांनी त्यांची ही रजा मंजूर केली आहे. रजा कालावधीत हत्तिणींच्या पायांचे चोपिंग केले जाते. त्यांच्या थकलेल्या पायांची शुश्रूषा केली जाते. गरम पाणी, तेल आणि वेगवेगळ्या वनौषधींचा वापर करून या हत्तिणींचे पाय शेकले जातात. हत्तिणींचे पाय मजबूत व निरोगी राहण्याकरिता, त्यांच्या पायांना पडलेल्या भेगा भरून काढण्याकरिता सतत १५ दिवस त्यांचे पाय चोपिंग अंतर्गत शेकले जातात. आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक आहार त्यांना दिला जातो. काम करताना, राबताना थकलेल्या पायांना पडलेल्या भेगा भरून काढण्याकरिता, पाय मजबूत व निरोगी ठेवण्याकरिता ही शुश्रूषा केली जाते.
मध्य भारतातील पहिली हत्ती सफारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोलकासला आहे. या हत्ती सफारीला राजस्थान, गुजरातसह अन्य राज्यातील पर्यटकांनी पसंती दर्शविली आहे. स्वदेशी तसेच विदेशी पर्यटकांचे ते आकर्षण ठरले आहे. हत्ती सफारीच्या निमित्ताने चंपाकली, लक्ष्मी, आणि सुंदरमाला नामक चार हत्तिणी पर्यटकांच्या सेवेत असून वन व वन्यजिवांच्या संरक्षणार्थही राबत आहेत. हत्ती सफारी अंतर्गत पर्यटकांच्या सेवेत राबणाऱ्या सुंदरमाला, चंपाकली, लक्ष्मी आणि जयश्री या हत्तिणींना ही पंधरा दिवसांची विशेष रजा मंजूर करण्यात आल्यामुळे हत्ती सफारी बंद राहणार आहे. रजेवरील हत्तिणी २६ जानेवारीला परतणार आहेत. यामुळे २६ जानेवारीपासून हत्ती सफारी पूर्ववत सुरू होणार आहे.