चेन्नई : राष्ट्रगीत न वाजवल्यामुळे तामिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रमुक (डीएमके) आणि राज्यपालांमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. त्यामुळे विधानसभा अधिवेशनाला संबोधित न करताच राज्यपालांनी सभागृह सोडल्याची घटना घडली. तामिळनाडू विधानसभेच्या अधिवेशनाला आज, सोमवारी प्रारंभ झाला. नियमानुसार विधानसभेच्या अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने प्रारंभ होतो. परंतु, अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी द्रमुक सरकारच्या भूमिकेवर संतप्त झाले. विधानसभेच्या अधिवेशनाला संबोधित न करता त्यांनी सभागृह सोडले. तामिळनाडू विधानसभेच्या अधिवेशनाला राज्यगीताने प्रारंभ झाला. यानंतर राष्ट्रगीत वाजवण्याची मागणी राज्यपाल आरएन रवी यांनी केली. मात्र त्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही.
त्यामुळे संतप्त झालेल्या राज्यपालांनी अभिभाषण न करताच सभागृह सोडले. या प्रकरणी तामिळनाडू राजभवनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या निवेदनात सांगितले की, ‘तामिळनाडू विधानसभेत पुन्हा एकदा भारताच्या संविधानाचा आणि राष्ट्रगीताचा अपमान झाला आहे. राष्ट्रगीताचा आदर करणे हे राज्यघटनेत पहिले मूलभूत कर्तव्य सांगितले आहे. सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये अधिवेशनाच्या सुरुवातीला आणि शेवटी राष्ट्रगीत गायले जाते. राज्यपाल सभागृहात आले तेव्हा फक्त तामिळनाडूचे राज्यगीत ‘तामिळ थाई वाझ्थू’ गायले गेले.
राज्यपालांनी सभागृहाला आपल्या घटनात्मक कर्तव्याची आदरपूर्वक आठवण करून दिली आणि राष्ट्रगीत वाजवण्याची मागणी केली; परंतु त्यांचे आवाहन मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि सभागृहाच्या अध्यक्षांनी फेटाळले. ही गंभीर चिंतेची बाब आहे. अशा स्थितीत राष्ट्रगीत आणि भारतीय राज्यघटनेच्या अपमानाचा भाग न घेता राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृह सोडले. मागील दोन वर्षांपासून तामिळनाडू विधानसभेच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरून बराच वाद झाला होता. गेल्या वेळी राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सरकारच्या निवेदनातील काही ओळी वाचण्यास नकार दिला होता. ज्यावरून बराच वाद झाला होता.