मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात नुकतीच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही कसोटी मालिका पार पडली. या मालिकेसाठी आलेल्या प्रेक्षकांची विक्रमी संख्या लक्षात घेता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष जय शाह यांनी नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, कसोटी क्रिकेटचं दोन स्तरांमध्ये विभाजन केलं जाऊ शकतं. जय शाह यांनी नुकतीच भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डांसोबत बैठक घेतली, ज्यामध्ये वर्षभरात आणखी कसोटी मालिका आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. नुकतीच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील पाचही सामन्यांसाठी मोठ्या संख्येत चाहत्यांनी हजेरी लावली होती. या गोष्टी आता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष जय शाह आणि ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व भारत हे क्रिकेट बोर्ड कसोटी क्रिकेटला दोन भागात विभागण्याचा विचार करत आहेत, ज्यामुळे हे संघ एकमेकांविरुद्ध जास्तीत जास्त क्रिकेट खेळू शकतील. कसोटी क्रिकेटमध्ये २ स्तर – नव्या बदलानुसार, कसोटी क्रिकेटची दोन स्तरांमध्ये विभागणी करण्यावर चर्चा सुरू आहे.
सध्याच्या अव्वल संघांना पहिल्या स्तरात ठेवता येईल. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. जे संघ कसोटी क्रिकेटमध्ये दुय्यम मानले जातात, त्यांना दुसऱ्या स्तरावर ठेवता येईल. यामध्ये बांगलादेश, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा समावेश असू शकतो. या फॉरमॅट अंतर्गत लेव्हल-१ आणि लेव्हल-२ संघ एकमेकांना सामोरे जातील. या नव्या बदलात प्रमोशन आणि डिमोशन सारखे नियम समाविष्ट केले जातील की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे तिसरे पर्व सुरू आहे. चौथ्या पर्वाला जून २०२५ मध्ये सुरुवात होणार असून २०२७ मध्ये या पर्वाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर कसोटी क्रिकेट दोन विभागात खेळवण्याची योजना अंमलात आणली जाऊ शकते. २०२७ मध्ये कसोटी क्रिकेटला १५० वर्षेही पूर्ण होणार आहेत.
दरम्यान सर्वोत्तम संघामध्ये सामने व्हायला हवेत याचे समर्थन माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही केले होते. “मोठ्या संघाचे दुसऱ्या मोठ्या संघाशी जास्त सामने झाले तर कसोटी क्रिकेट वाचविण्यात मदत होईल”, असं माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री म्हणाले होते. अशाप्रकारचा विचार २०१६ मध्येही करण्यात आला होता. मात्र, दुय्यम संघांच्या विरोधामुळे बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी ही कल्पना नाकारली होती. मात्र, आता या निर्णयानंतर ८ वर्षांनी चित्र बदलल्याचे दिसत आहे.आता कसोटी क्रिकेटमधील बदल हा पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटमध्ये बदल दिसणार का हे पाहावे लागणार आहे.