नाशिक : राज्यामध्ये लोकशाही आहे ठोकशाही नाही असे सांगून माजी मंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नाला जोरदार उत्तर दिले. छगन भुजबळ सोमवारी सकाळी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन आपल्याला मंत्री करणार असल्याच्या चर्चा आहेत प्रश्न विचारल्यावर त्यावर उत्तर देतांना भुजबळ म्हणाले की,”मी याआधीही सांगितले आहे की मला मंत्री व्हायचं आहे, म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावे, असे माझ्या स्वप्नातही येणं शक्य नाही. दुसरे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की, पूर्ण चौकशी केल्यानंतर ते आका काय किंवा काका काय, जे कोणी लहान मोठे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यावेळी बोलताना बीड प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे यांचा जोपर्यंत सहभाग असल्याचे कन्फर्म होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेणे योग्य नसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मात्र, त्याआधीच आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागत आहोत? चौकशीत काही बाहेर आले आहे का? असा सवाल भुजबळांनी यावेळी केला. तसेच जोपर्यंत कन्फर्म होतं नाही, तोपर्यंत राजीनामा घेणं योग्य नाही, असेही सांगून भुजबळ म्हणाले की मलाही तेलगी प्रकरणांमध्ये राजीनामा द्यावा लागला होता पण नंतर सर्व स्पष्ट झालं आणि मी निर्दोष सुटलो त्यानंतर मी परत मंत्रिमंडळात आलो पण आता तिचे चौकशी सुरू आहे मग राजीनामा घेण्याचा प्रश्नच कुठे येतो. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी परभणीतील मूक मोर्चात बोलतांना मंत्री धनंजय मुंडेंना राज्यात फिरू देणार नाही, असे म्हटले होते. त्यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया देत मनोज जरांगेवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “याठिकाणी लोकशाही आहे, ठोकशाही नाही. जरांगे यांचे उपोषण सोडवायला चार ते पाच वेळा धनंजय मुंडे गेले होते ते एकमेकांना ओळखतात”, असे म्हणत छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.