नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना तातडीने सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने पंतप्रधानांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या पीएम-केअर्स फंडात महामारी ओसरल्यानंतरही मदतीचा ओघ सुरूच आहे. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात पीएम-केअर्सला तब्बल ९१२ कोटींचा निधी प्राप्त झाला, असे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
२०२२-२३ म्हणजेच मागील आर्थिक वर्षातील ही आकडेवारी अंतिम ताळेबंद आता जनतेच्या माहितीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यानुसार या आर्थिक वर्षात मिळालेल्या सुमारे ९१२ कोटी रुपयांच्या देणग्यांपैकी सर्वाधिक ९०९.६४ कोटी एवढी रक्कम देशांतर्गत वैयक्तिक देणगीदारांकडून प्राप्त झाली आहे. तर २ कोटी ४७ लाख रुपयांच्या देणग्या परदेशांमधून आल्या आहेत.
९१२ कोटींच्या देणगीव्यतिरिक्त पीएम-केअर्सला मागील आर्थिक वर्षात १७०.३८ कोटी रुपयांचा महसूल ठेवींवरील व्याजापोटी मिळाला आहे. यामध्ये १५४ कोटी रुपये भारतातील खात्यांमधून तर १६.०७ कोटी रुपये परदेशी खात्यांमधून मिळाले आहेत.