लखनऊ – बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांचा ३४ वर्षांचा पुतण्या आणि राजकीय वारस आकाश आनंद आता पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेणार असल्याची माहिती आहे. ६ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशमधील नगीना मतदारसंघातून त्याच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे. भीम आर्मीचे प्रमुख व आझाद समाज पार्टी (कांशीराम)चे प्रमुख नेते चंद्रशेखरआझाद हेदेखील याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या हा मतदारसंघ जोरदार चर्चेत आहे.
बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश हे नगीनामधील कॉलेज ग्राऊंडमध्ये आपली पहिली सभा घेणार आहेत. १९ एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये उत्तर प्रदेशमधील आठ मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी नगीना हा एकमेव मतदारसंघ आहे; जो अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. मायावतीदेखील १३ एप्रिलपासून हरिद्वार या तीर्थक्षेत्रामधून आपल्या राष्ट्रीय प्रचारास सुरुवात करणार आहेत. नगीना या मतदारसंघात मुस्लिम आणि दलित बहुसंख्येने आहेत. या मतदारसंघात मुस्लिम ४० टक्के; तर दलित २० टक्के आहेत. तसेच या मतदारसंघात ठाकूर, जाट, चौहान राजपूत, त्यागी व बनिया या जातींचेही प्राबल्य आहे.