हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान एसटीत पुन्हा सुरू करणार..!

0

– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा..

पनवेल : स्वच्छ बस स्थानक, सुंदर व निटनेटका बसस्थानक परिसर आणि प्रसन्न स्वच्छतागृहाची सेवा उपलब्ध करून देणे हे एसटी प्रशासनाचे मुलभूत कर्तव्य आहे. त्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवून राज्यभरातील सर्व बसस्थानकांचा कायापालट करणे हा आमचा उद्देश आहे,असे प्रतिपादन नवे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. त्यांनी आज पनवेल व खोपोली बसस्थानकाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

आधुनिक युगामध्ये ” स्वच्छता ” हा कोणत्याही व्यवसायाचा मूलभूत पाया असतो. त्यामुळे प्रवासी सेवेमध्ये प्रवाशांना स्वच्छ, सुंदर बसस्थानक, बस स्थानकाचा परिसर आणि तेथील प्रसाधनगृहे पुरवणी याला भविष्यात आमच्या कडून प्राधान्य देण्यात येईल. याबरोबरच प्रत्येक आगारात चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांसाठी असलेली विश्रांती गृही देखील स्वच्छ आणि निटनेटकी असावेत यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. या भेटीमध्ये मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकावरील प्रसाधनगृहाला भेट देऊन तेथील प्रशासनाला अस्वच्छतेबाबत खडे बोल सुनावले तसेच बसस्थानकावरील आरक्षण खिडकी, पिण्याच्या पाण्याचे सोय याची पहाणी केली. फलाटावर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला, त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या तसेच त्यांच्या तक्रारीचे तातडी निवारण करण्याचे निर्देश उपस्थित एसटी अधिकाऱ्यांना दिले.

पनवेल ते खोपोली एसटी बसमधून प्रवास
या भेटीमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वसामान्य प्रवाशांच्या बरोबर पनवेल ते खोपोली या मार्गावर एसटीच्या लालपरीतून प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. बसमधील सहप्रवासी महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी, ज्येष्ठ नागरिक सर्वसामान्य प्रवासी यांनी बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात, बसेस स्वच्छ व यांत्रिक दृष्टीने निर्दोष असावेत अशी मागणी केली. यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले की लवकरच एसटीचे ताफ्यामध्ये नव्या बसेस उपलब्ध होत आहेत .या बसेस आल्यानंतर पनवेल- खोपोली, पनवेल -अलिबाग आणि पनवेल- कल्याण या मार्गावर नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले.

बसस्थानक परिसरातील स्क्रॅप वाहने तातडीने हलविण्याचे निर्देश.
प्रवाशांच्या वाहतुकीची गैरसोय करून परिवहन विभाग व अन्य विभागांनी बस स्थानकाच्या परिसरात अडगळीत टाकलेली स्क्रॅप वाहने तातडीने इतर ठिकाणी उचलून न्यावीत असे निर्देश यावेळी पर्यावरण मंत्री प्रताप सनाईक यांनी दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech