करचोरी, करगळती रोखून कर्तव्यात हयगय न करता रिझल्ट ओरियंटेड काम करा…….!

0

उपमुख्यमंत्री अजित पवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : अनंत नलावडे
महायुती सरकारच्या मंत्र्यांचे खातेवाटप होताच उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोडवर आले असून करसंकलन आणि महसुलवाढीच्या प्रक्रियेत सुसुत्रता, सुधारणा आणत ‘रिझल्ट ओरियंटेड’ काम करण्याचे सक्त निर्देश त्यांनी मंगळवारी आपल्या मंत्रालयातील आपल्या समिती कक्षात घेतलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ चाललेल्या बैठकीत बोलताना दिले.त्याचवेळी अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार करतानाच करचोरी,करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री अॅड.अशिष जयस्वाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वस्तू व सेवा कर विभागाचे राज्य आयुक्त आशीष शर्मा, वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) सचिव शैलजा ए., लेखा व कोषागारे विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपसचिव रविंद्र औटे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त विश्वनाथ इंदिसे, सहआयुक्त सुनिल चव्हाण,अपर आयुक्त यतीन सावंत, उपायुक्त सुभाष बोडखे,उपायुक्त शंकर जगताप आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी प्रलंबित योजना,आवश्यक निधी,तसेच राज्याच्या उत्पन्नाचा आढावा घेतला. या बैठकीत राज्यातील महसुली सुधारणा, शेती विकास,औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यांसारख्या विविध विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी वित्तीय योजना आणण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.करसंकलनाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्यात येतील.परंतु कामात परिस्थितीत हयगय चालणार नसल्याचे सांगत रिझल्ट ओरियंटेड काम करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.त्याचवेळी राज्यातील बेकायदा दारूविक्रीवरही कडक निर्बंध आणण्यासाठी पारदर्शक व्यवस्था उभारण्याचे सक्त निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech