नैरोबी – केनियामधील डॉक्टर गेल्या दोन आठवड्यांपासून संपावर असून त्यामुळे या देशातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. त्यामुळे केनियात रुग्णांचे हाल होत आहेत. योग्य वेतन आणि चांगल्या सुविधांची मागणी या डॉक्टरांनी केली असून आपल्या मागण्यांसाठी नैरोबीच्या रस्त्यावर येत निदर्शने केली.
जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत हा संप सुरुच राहणार असल्याची माहिती केनियातील डॉक्टर संघटनाचे सचिव डॉ. दावजी भिमजी यांनी म्हटले आहे. आमची गरीबी आणि मानहानी थांबवावी एवढीच आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. या संपामुळे हजारो केनियावासी हे आरोग्य सेवेच्या प्रतिक्षेत रुग्णालयाच्या बाहेर ताटकळतांना दिसत आहेत.
केनियाच्या आरोग्य मंत्री सुसान नखुमिचा यांनी म्हटले आहे की, देशातील दोन महत्त्वाच्या रुग्णालयांना नव्या डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. हे नवे डॉक्टर संपावरील डॉक्टरांची जागा घेतील. डॉक्टरांच्या नेत्यांनी मात्र या सूचनेला आक्षेप घेतला असून नवीन डॉक्टर रुग्णालये चालवू शकणार नाहीत असे म्हटले आहे. त्याने मुळ प्रश्नही सुटणार नाही. गेल्या आठवड्यापासून संपकरी डॉक्टरांनी आपात्कालीन सेवाही थांबवली आहे. न्यायालयानेही संघटना आणि आरोग्य मंत्रालयाने यामध्ये चर्चा करुन तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. केनिया आरोग्य सेवेचे प्रमुख फेलिक्स कोसगीई यांनी संघटनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सरकार त्यांच्या मागण्यांबाबत वाटाघाटी करायला तयार असून त्यामध्ये केवळ आर्थिक अडचण असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.