संकटे आली तरी खचून जाऊ नका…’जीनियस जेम डॉ. जीएम’ या कार्यचरित्रातून तरुणाईला संदेश – डॉ. सच्चिदानंद शेवडे

0


ठाणे : ‘आजकाल नकार ऐकण्याची सवय नसल्यानेच तरुणाईमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढीस लागले आहे. तेव्हा, कितीही संकटे आली तरी खचून जाऊ नका. हाच संदेश ‘जीनियस जेम डॉ. जीएम’ या कार्यचरित्रामधून तरुणाईला दिला आहे. नशीब दार ठोठावते पण ते दार उघडण्याचा कंटाळा करू नका. अडथळ्यांची शर्यत पार करीत डॉ गंगाधर वारके नावाचा एक मराठी माणुस स्वतःचा उद्योग उभारतो, अनेकांना रोजगार देतो. हे महत्वाचे आहे. तेव्हा हे एका माणसाचे चरित्र नसून तरुणाईसाठी आदर्श व मार्गदर्शनपर असे पुस्तक आहे.’ असे प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते आणि प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. प्रगतिशील उद्योगपती व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. गंगाधर मोतीराम वारके अर्थात डॉ.जीएम यांचे कार्यचरित्र ‘जीनियस जेम डॉ. जीएम’ या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

डॉ. शेवडे पुढे म्हणाले की, ‘खान्देशातील एका खेडेगावातून आलेला एक युवक संशोधक बनून उद्योजक बनतो. सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचे त्याचे हे स्थित्यंतर अलौकिक आहे. त्या काळात सुक्ष्मजीवशास्त्रामध्ये भारतामध्ये जे काम करायला कुणी उत्सुक नव्हते ते काम डॉ. वारके यांनी केले,ज्याची दखल विदेशातील कंपन्यांनी घेतली. त्यांच्या विस्तारित संपुर्ण कुटुंबाने संशोधनात किंबहुना उद्योगात एकत्र येऊन एवढे मोठे साम्राज्य उभारले आहे. हे म्हणजे,‘एक है तो सेफ है’ हे डॉ. वारके यांनी या आधीच ओळखले होते’ असे मिश्किल भाष्य डॉ. शेवडे यांनी केले. स्वाईनफ्लू , कोरोना काळात देशाला ज्याची गरज होती ते पुरवून या डॉ. वारके यांच्या कंपनीने एक प्रकारे देशसेवाच केल्याचे त्यांनी सांगितले.’

लेखिका अनुराधा परब लिखित आणि विनायक परब संपादीत ‘जीनियस जेम डॉ जीएम’ या पुस्तकाचे प्रकाशन रोहन प्रकाशनाचे वतीने व कार्यक्रमाचे आयोजक अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील ईबिस हॉटेलच्या सभागृहात नुकताच पार पडले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मभूषण डॉ ज्येष्ठराज जोशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ‘भारतात मुबलक खनिज आणि श्रमशक्ती आहे पण तंत्रज्ञान नाही. आज आपण सर्विस सेक्टरमध्ये काम करतो म्हणजेच जगाची हमाली करीत आहोत. तेव्हा, देशाला श्रीमंत व्हायचे असेल तर आपल्याला निर्मिती करावी लागेल.’ तसेच त्यांनी जीनियस जेम डॉ जीएम हे पुस्तक प्रत्येक तरुणाला वाचण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले.

पुस्तकाच्या प्रस्तावनाकार आणि प्रसिद्ध लेखिका डॉ उज्वला दळवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘काही पुस्तकं निखळ आनंद देतात , काही पुस्तकं सखोल ज्ञान देतात, काही पुस्तकं प्रेरणा देतात तर काही रोमहर्षक व चित्तथरारक असतात. ‘ जीनियस जेम डॉ जीएम ‘ या पुस्तकात सगळे काही आहे. हे पुस्तक रोजच्या जगण्याला एक नवीन शिस्त लावते , नवीन ताकद देते.’

या प्रसंगी रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर यांनी प्रकाशकाचे भूमिकेतून या पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले तर डॉ अरविंद देशमुख आपल्या छोटेखानी मनोगतातून अशा प्रकारच्या पुस्तकांची तरुण पिढीला आवश्यकता असल्याचे सांगितले.प्रा लक्ष्मण भोळे तसेच यजुवेंद्र महाजन यांनी पुस्तकाच्या तसेच डॉ गंगाधर वारके यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचा साक्षेपी आढावा घेतला. डॉ विशाल वारके यांनी आपल्या वडिलांच्या जीवनातील विविध पैलू उलगडून दाखविले.कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती डॉ गंगाधर वारके यांनी आपल्या मनोगतातून हे पुस्तक लिहिण्यामागील भूमिका आणि प्रेरणा विशद केली. तर या कार्यचरित्राच्या लेखिका अनुराधा परब यांनी पुस्तकाच्या लेखन प्रक्रियेपासून त्याच्या मूर्त रूपातील प्रकाशनापर्यंतचा प्रवास उलगडून दाखविला.

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास पद्मभूषण डॉ. जेष्ठराज जोशी, पद्मश्री सुधारक ओलवे, दीपस्तंभचे यजुवेंद्र महाजन, डॉ. उज्वला दळवी, डॉ.गिरीश ब.महाजन, डॉ. अरविंद देशमुख, डॉ. सुहास वारके, रोहन चंपानेरकर, हायमिडियाच्या आयटी हेड सरोज वारके, डॉ. विशाल वारके, डॉ. राहुल वारके, डॉ. प्रीती वारके, डॉ. श्वेता वारके, मार्केटिंग डायरेक्टर व्ही एम वारके, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार वासुदेव कामत, पद्मश्री सुधारक ओलवे, डॉ. विजय कदम, हेमंत नेहते आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. गंगाधर वारके हे आपल्या सुक्ष्मजीव शास्त्रीय उद्योगाच्या माध्यमातून ‘मेक इन इंडीया’ चा पुरस्कार करीत असल्याचे सांगितले. तीन तासांहून अधिक काळ रंगलेल्या या प्रकाशन सोहोळ्यामध्ये डॉ योगेश जोशी आणि अनुया धारप यांच्या अप्रतिम सुत्रसंचालनाने रंग भरले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ गिरीश महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ श्वेता वारके यांनी केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech