जोधपूर : राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात चार ते पाच पोलीस किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात पाली जिल्ह्यातील रोहट आणि पणिहारी चौकाजवळ झाला. दरम्यान, वसुंधरा राजे यांनी आपली गाडी थांबवून जखमी पोलिसांची विचारपूस केली. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ताफ्यात असलेली पोलिसांची गाडी उलटल्याने पोलीस कर्मचारी रूपराम, भाग चंद, सूरज, नवीन आणि जितेंद्र जखमी झाले. दरम्यान, कॅबिनेट मंत्री ओटाराम देवासी यांच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून वसुंधरा राजे मुंदरा या गावातून जोधपूरला परतत होत्या. त्यावेळी पाली जिल्ह्यातील रोहट आणि पणिहारी चौकाजवळ हा अपघात झाला. या अपघातानंतर वसुंधरा राजे यांनी आपली गाडी थांबवून जखमी पोलिसांची विचारपूस केली. तसेच, जखमी पोलिसांना तातडीने अॅम्ब्युलन्समधून बाली रुग्णालयात पाठवण्याची सोय केली. याशिवाय, बालीचे आमदार पुष्पेंद्र सिंह यांनाही जखमी पोलिसांसोबत रुग्णालयात पाठविण्यात आले. सध्या जखमी पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.