सुरत – मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील सुरत स्थानकाचे काम अंतीम टप्प्यात आले असून बुलेट ट्रेन प्रकल्प डिसेंबर २०२६ मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. सुरत काटोदरा रस्त्यावर अंत्रोली इथे या स्थानकाचे काम सुरु आहे. स्थानकातील बांधकाम व इतर सुविधांबरोबर या स्थानकाचे लोखंडी चौकटीचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये इतर आवश्यक कामेही पूर्ण होण्याची शक्यता आहे.
स्टेट ऑफ आर्ट पद्धतीने तयार केलेले हे स्थानक बहूमजली असून त्याच्या पहिल्या मजल्यावर प्रवाशांसाठी विविध सोयी सुविधा पुरवण्यात येणार आहेत. यामध्ये विविध बँकांचे एटीएम, उच्च दर्जाची देखभाल असलेली स्वच्छतागृहे, आलीशान सुविधा असेलेली प्रतिक्षागृहे आणि खानपान सेवांचे स्टॉल उपलब्ध असतील. सुरत हे हिऱ्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले शहर असल्यामुळे या स्थानकाच्या दर्शनी भागाला हिऱ्यांच्या पैलूंची स्वरुप देण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाची सुरुवात ही २०१७ साली झाली होती.
जपान सरकारच्या सहकार्याने तयार होणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण खर्च १.१ लाख कोटी आहे. बुलेट ट्रेनच्या संचालनासाठी मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल ही कंपनी तयार करण्यात आली आहे. जपानच्या शिंकसन तंत्रज्ञानाने या बुलेट ट्रेनचे परिचलन होणार आहे. ही प्रणाली जगभर सर्वाधिक सुरक्षित समजले जाते. सुरत स्थानकाच्या मुंबईच्या दिशेचे वायडक्टचेही काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरचे पुढचे स्थानक बिलिमोरिया असून त्याचेही काम सुरु आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबादचा प्रवास केवळ दोन तास ७ मिनिटात होणार असून ही रेल्वे सर्व स्थानकांवर थांबली तरीही त्यासाठी केवळ तीन तास लागणार आहेत.