मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर पोहोचले असून पहिल्या दिवशी त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांची भेट घेत अनिवासी भारतीयांनी जगाच्या प्रगतीमध्ये दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली आहे. कुवेत देशात वास्तव्य करून असलेल्या भारतीयांशी पंतप्रधान मोदींनी एका कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी नवे कुवेत घडविण्यासाठी भारतीयांचे मनुष्यबळ, कौशल्य साहाय्यकारी ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
यावेळी महाभारत आणि रामायणाचे अरबीमध्ये भाषांतर तसेच प्रकाशन करणाऱ्या कुवेतमधील दोन नागरिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भेट घेत कौतुक केले. दोन्ही ग्रंथांच्या अरबी आवृत्त्यांच्या प्रतींवरही पंतप्रधानांनी स्वाक्षरी केली.अब्दुल्ला अल-बरौन आणि अब्दुल लतीफ अल-नेसेफ यांच्या कार्याचा मोदी यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यातील मन की बात कार्यक्रमात उल्लेख केला होता. कुवेतचे श्रीमंत शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून मोदी कुवेतला गेले आहेत. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. ४३ वर्षांत भारतीय पंतप्रधानांची कुवेतला ही पहिलीच भेट आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी १९८१ मध्ये कुवैतला गेल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ कुवेतमध्ये शेख साद अल-अब्दुल्ला क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या ‘हाला मोदी’ या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात अनिवासी भारतीयांनी गर्दी केली होती. यावेळी मोदी यांनी सांगितले की, भारतातून कुवेत येण्यासाठी चार तास लागतात. भारताच्या विविध राज्यांतून कुशल कामगार कुवेतमध्ये नोकरी, व्यवसायासाठी आले आहेत. त्यांच्या रूपाने कुवेतमध्ये एक ‘मिनी-इंडिया’च साकारला आहे. दरवर्षी अनेक भारतीय या देशात येतात. मोदी म्हणाले की, भारतीय अतिशय कष्टाळू आहेत. त्यांच्या कामाची जगभरात तारीफ होते. नवा कुवेत घडविण्यासाठी भारतातील विविध कंपन्या मोठी भूमिका बजावू शकतील. परदेशात काम करणाऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार विविध पावले उचलत आहे.